महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडून श्रद्धांजली
मुंबई: माटुंगा येथील भाऊ दाजी रोडवरील सिद्धी अपार्टमेंटसमोर मॉकड्रील (mockdrill) दरम्यान झालेल्या अपघातात २९ जानेवारी रोजी तीन जवान जखमी झाले होते. त्यातील गंभीर जखमी सदाशिव कार्वे या अग्निशमन जवानाचा अखेर ३ फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला. त्याच्या दुर्दैवी मृत्यूबाबत अग्निशमन (Mumbai Fire brigade) दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.
भायखळा येथील अग्निशमन दलाच्या मुख्यालयात ४ फेब्रुवारी २०२२ रोजी जवानाचे पार्थिव मानवंदना देण्यासाठी व अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी मुख्यालयात जाऊन त्याच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले व पुष्पचक्र अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
सदाशिव कार्वे यांना या अपघातात आपला पाय गमवावा लागला होता. त्यांच्यावर महापालिकेच्या सायन रुग्णालयात (Sion Hospital) उपचार सुरू होते. मात्र मृत्यूशी झुंज देताना अपयश आले. ३ फेब्रुवारी रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश प्रमुख अग्निशमन अधिकाऱ्यांनी उपप्रमुख अग्निशमन अधिकाऱ्यांना यापूर्वीच दिले आहे.
याप्रसंगी प्रमुख अग्निशमन अधिकारी हेमंत परब तसेच अग्निशमन दलाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.