By Praveen Dixit

@PraveenDixitIPS

(लेखक श्री दीपक करंजीकर यांच्या अफगाणिस्तानवरील ‘अस्वस्थ सूत्र’ व श्री अय्यर लिखित “Who painted my money white” या इंग्रजी कादंबरीचा मराठी अनुवाद ‘विघ्नविराम’ ह्या दोन पुस्तकांचा दीनदयाळ प्रेरणा केंद्र आणि परममित्र पब्लिकेशन्स यांनी ठाणे येथे दि 22 एप्रिल 2022 रोजी आयोजित केलेल्या प्रकाशन समारंभात निवृत्त पोलीस महासंचालक श्री प्रवीण दीक्षित यांनी मांडलेल्या विचारांवर आधारित सारांश लेख.)

देशांतर्गत सुरक्षा (Internal security) कायम टिकवणे हे भारतासारख्या खंडप्राय देशापुढे फार मोठे आव्हान आहे. भारताचा लिखित स्वरूपात उपलब्ध असलेला गेल्या २५०० वर्षांचा इतिहास व त्यापूर्वीचा हजारो वर्षांचा हिंदू संस्कृतीचा (Hindu Culture) विकास याचा आज घडत असलेल्या अनेक गोष्टींवर खोल परिणाम जाणवतो. भारताची भौगोलिक स्थिती (Demography of India), भारतात उपलब्ध असलेल्या नैसर्गिक गोष्टींची रेलचेल, भारतातून जगाला आवश्यक अशा अनेक कलाकृतीच्या गोष्टी, मसाल्याचे पदार्थ, रेशीम, दागदागिने यामुळे गेली २५०० वर्ष भारतावर परकीयांकडून सतत आक्रमणे होत राहिली. त्यातील जवळ जवळ सर्व आक्रमणे भारताने यशस्वीरीत्या नेस्तनाबूत केली. परंतु त्याच बरोबर परकीय आक्रमकांनी अनेक भारतीयांची हत्या, विध्वंस करत इथल्या लाखो लोकांना जबरदस्तीने धर्मांतर करायला लावले.

धर्मांतरात इस्लाम (Islam) व ख्रिश्चन (Christian) हे प्रमुख होते. या दोन्ही धर्मांनी धर्मांतर केलेल्या त्या लोकांचा उपयोग करून त्यांच्या माध्यमातून या लोकांची निष्ठा ही भारतापेक्षा भारताबाहेरील ताकदींना चालू राहील यासाठी जोरदार प्रयत्न केले. हेच प्रयत्न आजही तितक्याच जोमाने चालू आहेत. दुर्दैवाने स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही अनेक दशके येथील राजकीय सत्तेनेही त्याला खतपाणी घातले. भारतात राज्य कोणाचेही असले तरी इथले राज्यकर्ते आपल्याला अनुकूल राहतील, यासाठी विविध प्रकारे प्रयत्न करण्यात आले, तसेच प्रयत्न आजही सुरू आहेत.

या प्रयत्नांचे विविध स्वरूप वेळोवेळी जाणवत राहते. मुख्य म्हणजे फोडा व राज्य करा (Divide and Rule) हे धोरण आहे. भारतातील लोक एकसंध राहू नयेत व त्यांनी एकदिलाने प्रयत्न करू नये यासाठी या परकीयशक्ती देशांतर्गत विविध गोष्टींचा जसे धर्म, जात, भाषा, प्रांत, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला, मुले यांचा सर्रास उपयोग करून देशामधे सतत अंतर्गत अस्वस्थता राहील व राज्यकर्त्यांचे लक्ष विकासाकडे (development) न लागता या समस्यांचे निराकरण करण्यात खर्ची पडेल याची खात्री केली जाते.

याउलट भारत सतत सर्व चराचरामधे एकच आत्मा आहे हेच सर्वांना सांगत राहतो. जगातील प्रगत समजल्या जाणार्‍या देशांकडे लक्ष दिल्यास, आढळून येते की त्या ठिकाणी ती राष्ट्रे एक विशिष़्ट धर्म देशाचा धर्म म्हणुन जाहीर करतात व त्या धर्माला अनुकूल अशी धोरणे ठेऊन इतर धर्मीयांना दुय्यम स्थान देतात. त्यामुळे त्या देशांची अर्थनीती (economic policy), परराष्ट्रनीती (Foreign affairs policy) ही विविध पक्ष सत्तेवर आले तरी त्यात सातत्य राहते. भारतात मात्र प्रत्येकवेळी अनेक विरोधी गटांना बरोबर नेण्याची तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे निव़डणूक जिंकण्यासाठी काही राजकीय पक्षांनी पुष्टीकरणाचे धोरण स्वीकारले.

त्यातच “भारत हा कधीही एक राष्ट्र नव्हता, आर्य (Aryan) लोक हे भारताच्या बाहेरून आलेले आहेत. इथल्या मूल निवासी लोकांवर त्यांनी सतत अत्याचार केले आहेत”, अशा धादांत खोट्या गोष्टींचा हिरीरीने प्रचार केला जातो. आजही शालेय अभ्यासक्रमात त्या स्वरूपाचे धडे मुलांना शिकवले जातात. मुलांना परकीय भाषेत शिक्षण देऊन, तुम्हाला जगभर नोकर्‍या मिळतील, भारतातील वरिष्ठ पदे मिळतील असा खोटा आशावाद निर्माण करून लाखो पालक परवडत नसतांनाही मुलांना परकीय भाषेत शिक्षण (Education in foreign language) घेण्यासाठी प्रोत्साहन देतांना दिसतात.

संस्कृतमिश्रित (Sanskrit) हिंदीपेक्षा इंग्रजी शिकुन आपला विकास होइल हा प्रचार आजही करण्यात येत आहे. ज्या मुलांना भारताचा इतिहास, भारतीय विचार, भारतीय भाषा यांचा गंध नाही, अशी भारत विरोधी सेना निर्माण करण्याची आपली अहमिका लागलेली दिसते. समाजमाध्यमांच्या (social Media) अनियंत्रित वापराने त्यात भर पडत आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या (New Education Policy) अंमलबजावणीनंतर यात फरक पडेल अशी अपेक्षा आहे.

अशा परिस्थितीत भारत एकसंध कसा ठेवायचा व ही जबाबदारी केवळ काही सुरक्षासंस्था (Security Forces), सनदी अधिकारी (Bureaucracy), काही विचारवंत पार पाडू शकतील का हा विचार करायला लावणारा मुद्दा आहे. भारत तोडू इच्छिणार्‍या या ताकदी शासनातील सर्वोच्च व्यक्ती, राजकीय पक्षांचे नेते, प्राध्यापक, पत्रकार, लेखक अशा लोक मानसावर ठसा ऊमटवणार्‍या महत्त्वाच्या व्यक्तींना विविध प्रकारची लालुच दाखवून समाजात दुही निर्माण करतात, विविध प्रकारची आंदोलने (Protest), रस्ता रोको (Rasta Roko) कार्यक्रम करतात व लोकांनी निवडुन दिलेल्या शासनास काम करणे अशक्य करतात. या कारवायांची सविस्तर माहिती ‘विघ्नविराम’ या कादंबरीत वाचायला मिळते.

या दृष्टीने अफगाणिस्तानचा (Afghanistan) विचार करणे महत्त्वाचे आहे. मुलतत्ववाद्यांनी मुल्ला व मौलवी यांच्या माध्यमातून सामान्य लोकांना सतत मागास ठेवले आहे. सर्व नैसर्गिक संसाधने असुनही लोकांना आधुनिक शिक्षण न मिळाल्याने तेथील लोक हाल अपेष्टा सहन करत राहतात. शेकडो वर्षे ते भारतावर आक्रमण करुन संपत्ती लुटत राहिले व आता गेली दोनशे वर्षे आक्रमणाला बळी पडत आहेत. यासाठी ‘अस्वस्थ सूत्र’ हे अफगाणिस्तानवरील पुस्तक जरुर वाचावे.

सन २०१४ साली नरेन्द्र मोदी (Narendra Modi) केन्द्रात सत्तेत आल्यापासून यात बदल करीत आहेत. आणखी काही बदल तातडीने करणे गरजेचे आहे.

डाव्या (Leftist) व देश विरोधी तत्वांनी (Anti National elements) अनेक विद्यापीठे व महाविद्यालये पोखरली आहेत. अमेरिकेतील (USA) विद्यापीठात सुरक्षा यंत्रणातुन निवृत्त अधिकार्‍याची प्राध्यापक म्हणून नेमणूक केली जाते. ते मुलांच्या लिखाणावर लक्ष ठेवुन देश विघातक प्रवृत्तीचा वेळच्या वेळी बंदोबस्त करीत असतात. विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) ने नुकताच नियम बदल करुन IFS/ IAS निवृत्त अधिकार्‍यांना केन्द्रीय विद्यापीठात काम करण्यास परवानगी दिली आहे. त्यात अजुनही बदल करण्य़ाची आवश्यकता आहे.

जे एफ केनेडी (JFK) अमेरिकेचे अध्यक्ष असताना, १२ वी उत्तीर्ण मुलांना जगातील अनेक देशात एक वर्षासाठी field study साठी पाठवण्यात येत असे. त्यांना खर्चासाठी सरकार निधी देत असे. त्याप्रमाणे भारतीय मुलांनाही एक वर्ष दुसर्‍या देशात पाठवून, यशस्वी मुलांना भारतातील विद्यापीठात प्राधान्य द्यायचा विचार करण्याची गरज आहे.

गेल्या वीस वर्षातील अफगाणिस्तानचा सखोल अभ्यास आवश्यक आहे. अफगाणिस्तान हे दहशतवादाचे केंद्र (epic centre of terrorism) म्हणून निर्माण झाल्यानंतर अमेरिकेने आपले सैन्य त्या ठिकाणी पाठवले. परंतु तेथील विकासाची सर्व कामे ही NGOs मार्फत केली जातील, असे धोरण ठेऊन सर्व विकासनिधी त्यांना उपलब्ध केला. त्यामुळे त्यांना संरक्षण देणे यातच सैन्य अडकून पडले. भ्रष्टाचार करतात म्हणून शासकीय यंत्रणांना दूर ठेवले गेले. त्यामुळे विकास झालाच नाही पण अफगाण शासकीय यंत्रणाही सक्षम झाल्या नाहीत.

अशाच प्रकारे परदेशातून निधी मिळवणार्‍या NGOs चे भारतात पेव फुटले होते. त्यातून भारत-विरोधी कारवाया करणाऱ्या भारतीयांचं एक प्रचंड सैन्य वा दबावगट निर्माण झाला होता. नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर अशा NGOs च्या कारवायांना चांगलाच चाप बसला आहे.

आत्मनिर्भर भारत (Atmanirbhar India) या संकल्पनेला नरेंद्र मोदी सरकारने प्राधान्य दिल्याने परदेशी शस्त्रास्त्र कंपन्या व त्यांच्यासाठी काम करणारे दलाल यांच्या कारवायांना लगाम लागला आहे. भारतातील होतकरू अशा शास्रज्ञ, उद्योजक यांना भरभराटीचे दिवस येऊ शकतील अशी आशा निर्माण झाली आहे.

नवीन भारताच्या निर्मितीसाठी नवीन धोरणांना विरोध करणार्‍या पक्षांना, व्यक्तींना त्यामुळे जनतेनेच नाकारणे आवश्यक आहे. लोकांनीही गैरकायदेशीर गोष्टींबाबत उदासीनता सोडून, सदैव सतर्क राहून, नरेंद्र मोदी सरकारच्या प्रयत्नांना यशस्वी करण्याची आवश्यकता आहे. ह्या दोन्ही पुस्तकांच्या प्रकाशन निमित्ताने माझे विचार आपल्या समोर मांडायला संधी दिल्याबद्दल मी आयोजकांचा ऋणी आहे.

(लेखक IPS श्री प्रवीण दीक्षित हे पोलीस दलातील सेवानिवृत्त सनदी अधिकारी आणि राज्याचे माजी पोलीस महासंचालक आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here