@maharashtracity

पालिका मुख्यालयाला ‘गुलाबी रोषणाई’चा झगमगाट

मुंबई: आंतरराष्ट्रीय बालिका दिवसानिमित्ताने मुंबई महापालिकेच्या (BMC) मुख्यलयाची हेरिटेज व नवीन इमारत सोमवारी रात्रीच्या सुमारास ‘गुलाबी विद्युत रोषणाई’ ने न्हाऊन निघाली. (BMC building decorated with pink lights on the occasion of International Day of the Girl child)

यंदाच्या (२०२१) आंतरराष्ट्रीय बालिका दिवसाचे घोषवाक्य ‘डिजीटल जनरेशन, अवर जनरेशन’ (Digital Generation, Our Generation) असे आहे. आधुनिक युगात, मुलांइतकाच मुलींनाही अद्ययावत तंत्रज्ञानाचा तसेच साधनांच्या वापराचा अधिकार मिळावा, हा या घोषवाक्यामागील जनजागृतीपर उद्देश आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाने (UN) सन २०११ पासून दरवर्षी ११ ऑक्टोबर रोजी ‘आंतरराष्ट्रीय बालिका दिवस’ म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली. जगभरातील बालिकांना भेडसावणाऱया समस्यांबाबत जनजागृती व्हावी, तसेच बालिकांना त्यांचे अधिकार मिळावेत, या हेतूने दरवर्षी ११ ऑक्टोबर रोजी हा दिवस साजरा करण्यात येतो.

आंतरराष्ट्रीय स्तरावर बालिका दिवस साजरा व्हावा, यासाठी संयुक्त राष्ट्रसंघामध्ये कॅनडा या देशाने नेतृत्व केले होते.

या पार्श्वभूमीवर, कॅनडाचे मुंबईतील राजदूत श्री. केथ कॅन यांनी, मुंबई महापालिका प्रशासनाला पत्र पाठवून ११ ऑक्टोबर २०२१ रोजी महापालिका मुख्यालयाची इमारत गुलाबी रंगाच्या विद्युत रोषणाईने उजळावी, अशी विनंती केली होती.

त्यांच्या या विनंतीचा मान राखून व बालिकांच्या हक्क, अधिकारांविषयी जनजागृती व्हावी, या उदात्त हेतूने सोमवारी मुंबई महापालिका मुख्यालयाची हेरिटेज (Heritage Building) व नवीन इमारत गुलाबी रंगातील विद्युत दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here