@maharashtracity

वरिष्ठ लिपीकाला अटक

दोन लाखांची होती मागणी

धुळे: धुळे जिल्हा उपनिबंधकांकडे (DDR) दोन लाखांची खंडणी मागणार्‍या व त्यापैकी 30 हजार रुपये स्विकारताना त्याच कार्यालयातील वरिष्ठ लिपीकाला शहर पोलिसांनी रंगेहात पकडले. या प्रकरणी लिपीकाला अटक झाली असून त्यांच्याविरोधात खंडणीचा (extortion) गुन्हा दाखल झाला आहे.

जिल्हा उपनिबंधक अभिजीत विजय देशपांडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, हस्ती बँकेच्या (Hasti Bank) संचालक मंडळ निवडणुकीसाठी देशपांडे यांची निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. हे काम करीत असतांना निवडणुकीत एकुण 16 उमेदवारी अर्जापैकी छाननी प्रक्रीयेत एका अर्जावर हरकत आल्याने त्याबाबत नियमानुसार सुनावणी घेवून तो नियमात बसत नसल्याने एक अर्ज नामंजुर केला.

हा अर्ज नामंजुर करण्यासाठी देशपांडे यांनी 15 लाख रुपये घेतले, असा दावा करीत वरिष्ठ लिपीक आनंद बाबुराव शिंदे याने दि. 24 नोव्हेंबर ते 27 डिसेंबर दरम्यान देशपांडे यांना त्रास देऊन धमकावायला सुरुवात केली.

शिंदे याने देशपांडे यांच्याकडे दोन लाख रुपयांची खंडणीची मागणी केली. पैसे न दिल्यास धुळ्यात (Dhule) काम करु देणार नाही, 15 लाख घेतले म्हणून वरीष्ठांकडे व पोलिसांकडे खोटे तक्रारी अर्ज करुन कोर्टाच्या चकरा मारायला लावेल, तसेच अ‍ॅट्रोसिटीची (Attrocity) किंवा पत्नी मुलीला बोलावून तुझ्यावर विनयभंगाची खोटी केस करुन तुला धुळ्यातून बदली करुन पाठवतो, नाही तर तुझा बेत पाहुन घेतो, असे वेळोवेळी धमकावले.

तडजोडीअंती 1 लाख 40 हजार रुपये खंडणी देण्याचे ठरले. यानंतर अखेर उपनिबंधक देशपांडे यांनी थेट शहर पोलिसांकडे तक्रार केली. तसेच खंडणीचा पहिला हप्ता 30 हजार घेतांना शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, सपोनि दादासाहेब पाटील, हे.कॉ. सतिश कोठावदे, पोना. राहुल सोनवणे, पो.कॉ. निलेश पोतदार, पो.कॉ. प्रसाद वाघ, पोकॉ. सचिन पगारे यांनी लिपीक आनंद शिंदे याला 27 डिसेंबर रोजी रंगेहात पकडले.

या प्रकरणी आनंद शिंदे विरुध्द भादवि कलम 384, 388, 389, 504, 506, 186 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here