@maharashtracity

मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाच्या गेट नं.-५ समोरील उघड्या मॅनहोलमध्ये पडलेल्या दोन कामगारांपैकी एक पिंटू सिंग (३४) याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर दुसरा कामगार सुकरकुमार सिंग (३५) याला दक्ष नागरिकांनी वेळीच बाहेर काढल्याने तो बचावला आहे. त्याला उपचार करून घरी पाठविण्यात आले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) गेट क्रमांक ५ च्या समोरील पाण्याच्या पाइप लाइनचे कंत्राटदाराकडून काम सुरू आहे. मात्र हे काम सुरू असताना तेथील उघड्या मॅनहोलमध्ये (manhole) शनिवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास पिंटू सिंग व सुकरकुमार हे दोघे कामगार पडले.

Also Read: ‘त्या’ दुर्दैवी घटनेचे भाजपकडून घाणेरडे राजकारण: यशवंत जाधव

त्याचवेळी तेथून ये – जा करणाऱ्या काही दक्ष नागरिकांनी तात्काळ मदतीला धावून सुकरकुमार सिंग याला अथक प्रयत्नांनी बाहेर काढले व त्याला उपचारसाठी नजीकच्या जीटी रुग्णालयात (GT Hospital) दाखल केले. त्यांच्यावर तात्काळ यशस्वी उपचार झाल्याने तो बचावला गेला. त्याला बरे वाटू लागल्याने घरी पाठविण्यात आले आहे.

मात्र त्याचा जोडीदार कामगार पिंटू सिंग हा वेळीच न सापडल्याने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यांनी बराच वेळ शोध घेतल्यानंतर तो सापडला. मात्र त्याला नजीकच्या जेजे रुग्णालयात (JJ Hospital) नेल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. ही घटना कशी घडली याबाबत स्थानिक पोलीस व अग्निशमन दल चौकशी करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here