@maharashtracity
जिल्हा हमाली कामगार संघटनेचा इशारा
धुळे: धुळे तालुक्यातील मोराणे येथील प्रताप नाना महाले कांदा खरेदी-विक्री केंद्रात बेकायदेशीरपणे हमाल व महिला कामगारांची नोंद करू नये, अन्यथा न्यायालयात दाद मागणार, असा इशारा जिल्हा हमाल कामगार संघटनेने दिला आहे.
याबाबत धुळे जिल्हा हमाल कामगार संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नियमानुसार अगोदर मालकाची नोंद माथाडी बोर्डात (Mathadi board) होणे आवश्यक आहे. मंडळाचे नोंदणीकृत हमाल, महिला कामगार जे अतिरिक्त असतील त्यांना काम दिल्यानंतर नवीन हमाल व महिला कामगार भरणे क्रमप्राप्त होते.
मात्र, या केंद्राचे मालक व त्यांचे समर्थक अधिकारी नियमांना छेद देत दुसर्याच हमाल व महिला कामगारांची नोंद करण्याच्या प्रयत्नात आहेत. अशी कोणीतीही बेकादेशीर नोंद केल्यास आम्हाला नाईलाजाने न्यायालयात दाद मागून जबाबदार अधिकार्यांकडून नुकसान भरपाई मागावी लागले, असा इशारा संघटनेने दिला.
जिल्हाधिकार्यांसमक्ष कोणताही निर्णय होत नाही तोपर्यंत या केंद्राबाबात काहीही करू नये. माथाडी मंडळाचे अध्यक्ष व तथा जिल्हाधिकारी यांच्या सुचना व आदेशाची अवहेलना होवू नये. अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशाराही देण्यात आला आहे. या मागण्यांचे निवेदन संघटनेचे अध्यक्ष गंगाधर कोळेकर, भागवत चितळकर, हेमंत मदाने (Hemant Madane), गायत्री साळवे आदींनी दिले.
माथाडी बोर्डाचे निरीक्षक हमाल संघटनांच्या
दबावात काम करताहेत – संदीप महाले
मोराणे गावाजवळील प्रताप नाना महाले खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती ही महाराष्ट्र पणन संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी परवाना दिलेली बाजार समिती आहे. ही बाजार समिती खाजगी आहे. शासनाचा म्हणजेच पणन संचालक महाराष्ट्र राज्य, पुणे यांचा अधिकृत खाजगी बाजार समितीसाठीचा परवाना असतांना वैयक्तिक व्देषापोटी माथाडी कामगार निरीक्षक, कामगार नेते व कामगार गैरकृत्य करुन जिल्हाधिकारी यांची दिशाभुल करीत आहे.
खरे तर जिल्हा हमाल कामगार संघटनेच्या पदाधिकार्यांच्या दबावात माथाडी बोर्डाचे निरीक्षक देवानंद बोरुडे यांनी आमच्या समितीला दि.14 डिसेेंबर रोजी बेकायदेशीरित्या टाळे ठोकले होते. यामुळे आमच्या समितीत शेतकर्यांनी विक्रीसाठी आणलेल्या व साठवून ठेवलेल्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. ही चूक निरीक्षक बोरुडेंच्या लक्षात आल्याने पुन्हा त्यांनीच दुसर्या दिवशी हे टाळे हटविले.
आता आज आम्ही बेकायदेशीरपणे हमाल, कामगारांची नोंद करीत असल्याचा आरोप हमाल संघटनेने केला गेला आहे. आम्ही कुठल्याही प्रकारे बेकायदेशीपणे कामगारांची नोंद करीत नाही आहोत. आमच्या समितीमध्ये काम करणार्या कामगारांची कायदेशीर नोंदणी झाली पाहीजे, अशी आमची मागणी आहे.
हमाल संघटनेच्या दबावात बोरुडे हे आमच्या समितीमधील कामगारांची अधिकृत नोंदणी करण्यास टाळाटाळ करीत आहेत. आमच्या कामगारांची नोंदणी व्हावी, यासाठी आम्हालाही न्यायालयाकडे दाद मागावी लागेल, अशी माहिती प्रताप नाना महाले खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष संदीप महाले (Sandeep Mahale) यांनी दिली.