@maharashtracity

मुंबई: राणी बागेतील पेंग्विनच्या देखभालीवरील १५ कोटी रुपये खर्च करण्याबाबतच्या टेंडरप्रक्रियेबाबत पालिका आयुक्त इकबाल चहल (BMC Commissioner IS Chahal) व महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांच्यात कुठेतरी समन्वयचा अभाव आहे, अशी प्रतिक्रिया पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा (Ravi Raja) यांनी दिली आहे.

महापौर पेडणेकर यांनी, राणीच्या बागेतील पेंग्विन कक्षातील पेंग्विनच्या देखभालीवर दरवर्षी साडेचार ते पाच कोटी रुपये खर्च करण्यात येत असून पुढील तीन वर्षांसाठी १५ कोटी रुपये खर्च करण्याबाबत टेंडर काढण्यात आले आहे. हे टेंडर पालिकेने कोणाच्याही विरोधामुळे अथवा दबावाखाली मागे घेतलेले नाही किंवा त्यात काही बदलसुद्धा केलेले नाहीत. हे टेंडर आहे, तसेच मंजूर करण्यात येणार आहे, अशी ठाम भूमिका बुधवारी मांडली.

याबाबत विरोधी पक्षनेते रवी राजा यांच्याकडे विचारणा केली असता, पेंग्विनच्या देखभालीचे टेंडर रद्द करावे, अशी माझी भूमिका नव्हती. मात्र पेंग्विनच्या खर्चात पालिकेने कपात करण्यासाठी काही बाबींची पूर्तता पालिका प्रशासनाने स्वतः करावी.

त्यामुळे खर्चात काही प्रमाणात कपात होऊ शकेल. माझ्या भूमिकेशी पालिका आयुक्त यांनीही सहमती दर्शवली होती. मात्र ज्या प्रकारे महापौर यांनी, १५ कोटींच्या टेंडरबाबत भूमिका घेतली अथवा मांडली आहे, ते पाहता महापौर व आयुक्त यांच्यात कुठेतरी समन्वयाचा अभाव असल्याचे जाणवते, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here