पावसाळा सुरू होण्यापूर्वीच घरे खाली करण्याबाबत दिल्या होत्या नोटिसा
दरडीचा धोका पाहता जीवित हानी टाळण्यासाठी २५ कुटुंबांचे स्थलांतर
@maharashtracity
मुंबई: मुंबईत गेल्या रविवारपासून मुसळधार पाऊस (heavy rain) पडत असताना बुधवारी सकाळच्या सुमारास चुनाभट्टी येथील टेकडीलगतच्या घरांवर दरड (land sliding) कोसळली. या घटनेत एका महिलेसह तीन व्यक्ती जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर नजीकच्या सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्राप्त माहितीनुसार, चुनाभट्टी, नागोबा चौक, येथे टेकडीलगत असलेल्या नारायण हाडके चाळीतील तीन – चार घरांवर बुधवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास दरड कोसळली. ही घटना घडल्याचे समजताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले.
या घटनेत, तीन जण जखमी झाले होते. त्यापैकी शुभम सोनावणे (१५) याला जखमी अवस्थेत स्थानिकांनी सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तर घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी.
तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करून जखमी शुभम सोनावणे याचे वडील प्रकाश सोनावणे (४०) यांना व त्यांच्या सोबत सुरेखा विरकर (२८/ महिला) यांना जखमी अवस्थेत दरडीच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढून तात्काळ सायन रुग्णालयात दाखल केले.
शुभम व प्रकाश सोनावणे यांच्यावर ट्रॉमा वार्डमध्ये उपचार केले जात आहेत. तर सुरेखा विरकर यांच्यावर उपचार केल्याने त्यांना बरे वाटल्याने घरी पाठविण्यात आल्याचे समजते.
२५ कुटुंबियांचे पालिका शाळेत स्थलांतर
दरम्यान, महापालिकेच्या कुर्ला प्रभाग कार्यालयाने पुढील संभाव्य धोका लक्षात घेता टेकडी परिसरातील २५ घरे खाली करून त्यातील रहिवाशांना नाजीकच्या पालिकेच्या स्वदेशी महापालिका शाळेत स्थलांतर केले आहे. त्या ठिकाणी या नागरिकांच्या जेवण, नाश्ता, पाणी व राहण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचे पालिका कुर्ला ‘एल’ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त महादेव शिंदे यांनी सांगितले.
पावसाळ्यापूर्वीच बजावल्या होत्या नोटिसा
चुनाभट्टी येथील टेकडी कोसळण्याचा धोका लक्षात घेता पालिका प्रभाग कार्यालयाने पावसाळ्यापूर्वीच टेकडी लगतच्या काही रहिवाशांना घरे खाली करून सुरक्षित पर्यायी ठिकाणी स्थालांतर करण्यासाठी नोटिसा बजावल्या होत्या. मात्र, या रहिवाशांनी त्याची वेळीच गांभीर्याने दखल घेतली नाही, अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली.