नदी पात्रातून काढलेला गाळ नियोजनाअभावी पुन्हा पाण्यात

Twitter : @ManeMilind70

महाड

महाड व पोलादपूर तालुक्यात गेल्या 48 तासांमध्ये आतापर्यंतचा विक्रमी पाऊस पडल्याची नोंद नैसर्गिक आपत्ती निवारण कक्षातून देण्यात आली. सोमवारी दुपारनंतर सुरू झालेल्या मुसळधार पावसाने बुधवारी दुपारपर्यंत तब्बल 500 मी.मी. एवढी विक्रमी नोंद गाठली आहे. या दोन दिवसांच्या पावसामुळे महाडमधील रायगड रोडवरील कोंझर घाटात तसेच वरद घाटात व पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाटामध्ये मंगळवारी रात्री दरड कोसळली. महाड, बिरवाडी, महाड औद्योगिक वसाहत व पोलादपूर शहरासह माटवण, सवाद परिसरामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे.

मंगळवारी रात्रीपासून पावसाच्या माऱ्याने अनेक ठिकाणी महाकाय वृक्ष आणि विजेचे खांब उन्मळून पडल्याने विद्युतपुरवठा खंडीत झाला. एमआयडीसीला पाणीपुरवठा करणारे पोलादपूर शहरानजिकचे रानबाजिरे धरण बुधवारी दुपारी 58.35 मीटर भरून ‘ओव्हरफ्लो’ झाले. सावित्री नदीपात्रातून मागील चार महिन्यापासून महाड – पोलादपूर शहर, दोन्ही तालुक्याच्या ग्रामीण भागात पूरस्थिती उदभवू नये यासाठी उपाययोजना म्हणून पाटबंधारे विभागाने ठेकेदारामार्फत रचलेले गाळ उपशाचे ढिगाऱ्यांना सावित्री नदीपात्रामध्ये जलसमाधी मिळाली. त्यामुळे आता केवळ ठेकेदाराची बिले अदा करण्याचेच काम प्रशासनासह पाटबंधारे खात्याच्या अभियंत्यांना शिल्लक राहिले असून शासनाचा पैसा पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे, तर गाळ काढणारे ठेकेदार व अधिकारी मात्र करोडपती झाले आहेत.

महाड व पोलादपूर तालुक्यात सोमवारी दुपारपासून पावसाने जोर धरला. मात्र, रात्री धुवाँधार वाऱ्यासह पाऊस पडल्याने मंगळवारी सकाळी 152 मी.मी. पावसाची नोंद झाली. बुधवारी सकाळी 223 मी.मी. पावसाची नोंद झाली. मात्र, पावसाचा जोर बुधवारी दिवसभर कायमच राहिल्याने केवळ 48 तासांमध्ये महाड व पोलादपूर तालुक्यात विक्रमी 500 मी.मी. नोंद झाल्याचे आढळून आले. विक्रमी पावसाची नोंद झाल्यानंतर महाड तालुक्यातील सावित्री, गांधारी, काळ, नागेश्वरी तसेच पोलादपूर तालुक्यातील ढवळी, कामथी, घोडवनी, चोळई आणि सावित्री या पाचही नद्यांची पात्रं ओसंडून वाहू लागली आहेत.

महाडसह पोलादपूर शहरामध्ये 2021 मध्ये महापुरात तब्बल 8 ते 10 फुटापर्यंत उंचावर पूररेषा नोंदली केली असताना पुन्हा अशी पूरस्थिती निर्माण होऊ नये म्हणून महाड व पोलादपूर तालुक्यातील सावित्री, गांधारी, काळ, नागेश्वरी या नद्यांसह दोन्ही तालुक्यातील ग्रामीण भागातील उपनद्यांमध्ये नदीच्या पात्रामध्ये मागील पाच महिने गाळ उपसा मोठया प्रमाणात केला गेला. ठाणे व कोलाड जलसंपदा विभागामार्फत या कामाची निविदा घेणाऱ्या ठेकेदाराला नदीपात्रालगत उपसलेल्या गाळाचे ढिगारे ठेवून बिले अदा करण्याचे काम पाटबंधारे खात्याच्या महाड व पोलादपूर येथील तसेच कोलाड येथील अधिकाऱ्यांनी आपापले खिसे भरून इमान इतबार केले आहे. मात्र पावसाळा सुरू होताच नदी पात्रालगतच्या महाड व पोलादपूर तालुक्यातील नागरिकांनी याबाबत प्रशासनाकडे वारंवार तोंडी व लेखी पत्र व्यवहार करून देखील पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांकडे व महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनी पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांकडे बोटे दाखवणे व पत्र व्यवहार करणे या पलीकडे कोणतेच काम केले नाही.  

महाड व पोलादपूर तालुक्यातील नदीपात्राच्या लगत असणाऱ्या ग्रामस्थांनी पावसाळ्यातील पुराच्या धोक्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधून सावध केले. मात्र, महसूल प्रशासन आणि जलसंपदा विभागाचे पोलादपूर येथील कनिष्ठ अभियंता प्रज्योत पाटील आणि डेप्युटी इंजिनिअर अनिल बुधराम यांनी नागरिकांना दिलासा देण्याऐवजी ठेकेदाराला पाठीशी घालत गाळ उपशाचे ढिगारे हलविण्यासंदर्भात तत्परता दाखविणे टाळले. परिणामी, नदीपात्रालगत रचलेले गाळ उपशाचे ढिगारे मंगळवार व बुधवारी पडलेल्या पाचशतकी पावसाने सावित्री नदीच्या दुथडी भरून वाहणाऱ्या पात्रात अर्धेअधिक वाहून गेले. महसूल विभागाने या ढिगाऱ्यांची मोजमापे ठेवली होती अथवा कसे याचे माहितीचा अधिकार कार्यकर्ता विश्वास नलावडे यांच्या अर्जावर उत्तरही दिलेले नाही.

आंबेनळी घाटामध्ये चिरेखिंड भागात दरडी कोसळल्याने तहसिलदार कपिल घोरपडे यांनी घटनास्थळी भेट देऊन दरड हटविण्याकामी तातडीने आदेश दिले. हे दरडी हटविण्याचे काम सुरू असताना पोलादपूर पोलीसांनी आंबेनळी महाबळेश्वर घाटातील वाहतूक बंद ठेऊन संभाव्य धोका टाळला.

मंगळवारी रात्रीपासून पावसाच्या माऱ्याने अनेक ठिकाणी महाकाय वृक्ष आणि विजेचे खांब उन्मळून पडल्याने विद्युतपुरवठा खंडीत झाला. बुधवारी दुपारपर्यंत विजेचे खांब पुन्हा उभे करून विद्युतवाहक तारा ओढून विद्युतप्रवाह सुरळीत करण्यात आला. माटवण भागामध्ये काही घरांमध्ये अडकलेल्या ग्रामस्थांना स्थानिक ग्रामस्थांनी पुराचे पाणी शिरलेल्या घरातून सुरक्षितपणे बाहेर काढले.

पोलादपूरनजिकच्या रानबाजिरे धरण पावसाळयापूर्वी बॅकवॉटरचा साठा यंदा पावसाळयापूर्वीच रिकामा न केल्याने केवळ दोन दिवसांच्या पावसामध्ये धरणाचे बॅकवॉटर ओव्हरफ्लो झाले असून बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास धरणाने तब्बल 58.35 मीटर एवढी धोक्याची पातळी ओलांडली. या धरणासमोरील रानवडी आणि बोरावळे गावांकडे जाणाऱ्या छोटया पुलावरून पाणी वाहू लागले. यामुळे पोलादपूर शहराच्या उत्तरवाहिनी सावित्री नदीपात्रालगतच्या भागात पूरस्थिती निर्माण झाली. श्रीदेवी गंगामाता घाट परिसरात चोळई नदी आणि सावित्री नदी पात्राचे पुराचे पाणी एकत्र येऊन सिध्देश्वर आळी भागात पूरस्थिती निर्माण झाली. भैरवनाथनगराच्या नदीपात्रालगतच्या भागात समाधान शेठ यांच्या घरापासून सुभाष अधिकारी यांच्या घरापर्यत पुराचे पाणी जुना महाबळेश्वर रस्त्यावरून वाहू लागले. सवाद माटवण भगातील पूरबाधित क्षेत्रामध्ये विषारी सापांचा अधिवास पाण्याखाली आल्याने सर्प थेट पुराच्या पाण्यातून जमिनीवर सरपटत आल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here