महाराष्ट्रात पहिल्यांदाच मोफत फेरीबोट

@maharashtracity

महाड (रायगड): रायगड (Raigad) आणि रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यांना जोडणाऱ्या आंबेत पुलाचा पिलर झुकल्याचे निदर्शनास येताच या पुलावरील अवजड वाहतूक बंद केली गेली. आंबेत पुलाच्या दुरुस्तीसाठी युद्धपातळीवर काम केले जाणार आहे. मात्र, तत्पुर्वी याठिकाणी नदी ओलांडून जाण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (PWD Minister Ashok Chavan) आणि खा.सुनील तटकरे (NCP MP Sunil Tatkare) यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्रात पहिल्यांदाच मोफत फेरीबोट (Free Ferry boat service) सुरू करण्यात आल्याची माहिती शाखा अभियंता शिवलिंग उल्लागडे यांनी दिली.

महाडजवळील (Mahad) सावित्री नदीवरील पूल दुर्घटनेनंतर (Savitri river bridge incident) महाडसह कोकणातील (Konkan) सर्व पुलांची तपासणी करण्यात आली होती. आंबेत पुलाचीदेखील यादरम्यान पाण्याखालील यंत्रणेमार्फत ऑक्टोबर २०२१ मध्ये तपासणी करण्यात आली होती. पुलाच्या पाण्याखालील भाग सुस्थितीत असल्याने केवळ वरील भागात दुरुस्तीचे काम करण्यात आले.

मात्र, डिसेंबर २०२१ मध्ये केलेल्या सर्व्हेक्षणात पाया क्रमांक पाच झुकल्याचे दिसून आले. या पुलाचा पिलर खाडीच्या पाण्याच्या भरती आणि ओहोटीच्या वेळेस जवळपास दोन ते चार मिलिमीटरने हालत असल्याचे यांत्रिक साधनाद्वारे दिसून येत आहे. भविष्यातील धोका लक्षात घेऊन पुलावरील वाहतूक सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत (PWD) बंद करण्यात आली आहे. यामुळे दोन जिल्ह्यातील वाहतूक सद्या ठप्प झाली होती. याकरिता स्थानिक नागरिकांनी फेरीबोट प्रवास मागणी केली होती.

दिनांक 15 फेब्रुवारी 2022 रोजी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेण्यात आली. या बैठकीला खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे, सार्वजनिक बांधकाम खात्याचे सचिव साळुंखे, मुख्य कार्यकारी अभियंता, कार्यकारी अभियंता आदि अधिकारी उपस्थित होते. यावेळी पुलाची दुरुस्ती करण्याबरोबरच रो-रो सेवा सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार आंबेत येथे पुलानजीक रो-रो सेवा मोफत सुरू करण्यात आली.

आंबेत पुलामुळे रायगड आणि रत्नागिरी हे दोन जिल्हे जोडले जातात. यामुळे या मार्गावर कायम वाहनांची ये जा सुरू असते. या फेरी बोटीमुळे वाहनांबरोबरच स्थानिक नागरिकांना देखील नदीपलीकडे जाण्याची सुविधा निर्माण झाली आहे. मोफत रो – रो सेवा सुरू केल्याने स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे आभार व्यक्त करून या सेवेबाबत समाधान व्यक्त केले आहे.

“आंबेत पुलाच्या दुरुस्तीकरता हा पूल वाहतुकीस बंद ठेवण्यात आला आहे यामुळे स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार रो-रो सेवा मोफत सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेऊन या ठिकाणी सेवा सुरू करण्यात आली आहे.”

  • शिवलिंग उल्लागडे, शाखा अभियंता माणगाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here