@maharashtracity

वर्षभरापासून शाखा अभियंता सांभाळतोय उपविभागीय अभियंता पद

सार्वजनिक बांधकाम विभागाचे काम वाऱ्यावर वरात

By मिलिंद माने

महाड (रायगड): कोकणातील महाड सार्वजनिक बांधकाम विभागात (PWD) शाखा अभियंता आणि उपविभागीय अभियंता हे दोन्ही पद गेल्या एक वर्षांपासून एकाच व्यक्तीकडे आहे. त्यामुळे शाखा अभियंता म्हणून सुचवलेल्या कामाला उपविभागीय अभियंता म्हणून सही करणे असा चमत्कार एकच अधिकारी करत आहे. यातून मोठया प्रमाणात अपहार होत असल्याची शंका उपस्थित केली जात आहे.

तसेच, महाड कार्यकारी अभियंता यांच्या क्षेत्रातील महाड आणि पोलादपूर या उपविभागातील ३० ५४, २० ६९, २२ १६, या लेखाशिर्षाकाखाली केलेल्या कामांची बिले वर्षअखेरीस देण्यासाठी अधीक्षक अभियंता नवी मुंबई यांच्या कार्यालयात जाणे गरजेचे असते. मात्र, अद्यापही ही बिले या कार्यालयास सादर न करताच मर्जीतील ठेकेदारांना बी.डी.एस. द्वारे वर्षअखेरीस अदा करण्याची किमया महाड आणि पोलादपूर उपविभागाने केली आहे.

कोकणातील महाड सार्वजनिक बांधकाम विभागाचे (PWD) उपविभागीय अभियंता पद गेल्या वर्षभरापासून रिक्त असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे काम वाऱ्यावरची वरात या पद्धतीने सुरु आहे. येथील उपविभागीय अभियंता हे पद शाखा अभियंताच सांभाळत आहेत.

महाड तालुका हा कोकणातील (Konkan) मध्यवर्ती तालुका आहे. ऐतिहासिक तालुका असल्याने याठिकाणी देश आणि राज्यपातळीवरील दिग्गज नेते येत असतात. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केल्या जाणाऱ्या सुविधा आणि ग्रामीण विकासात्मक कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केले जातात. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचा कारभार गेल्या वर्षभरापासून वाऱ्यावर वराती या प्रकारे सुरु आहे.

हे पद रिक्त ठेवल्याने याठिकाणी भ्रष्टाचाराला निमंत्रण दिले जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता एस.व्ही.पठाडे यांची दिनांक ११/०८/२०२० मध्ये बदली झाल्यापासून या पदाचा अतिरिक्त कार्यभार दिनेश पराते यांच्याकडे सोपवला आहे.

या अतिरिक्त कार्याभाराला एक वर्ष पूर्ण झाले असले तरी अद्याप हे पद रिक्त ठेवण्यात आले आहे. हे पद रिक्त ठेवण्याची किमया मंत्रालयीन अधिकाऱ्यांनी करून गोंधळ घातला आहे.

दिनांक १ डिसेंबर २०२१ रोजी शासन आदेश क्रमांक पी.जि.ओ. २०२० / प्र.क्र. २७३/ सेवा -२ दिनांक १२/११/२०२१ अन्वये कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) संवर्गातून महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट – अ मधील उपविभागीय अधिकारी (स्थापत्य) पदावर पदोन्नती देवून ३९६ पदे संपूर्ण महाराष्ट्रात भरली गेली.

त्यापैकी रायगड (Raigad) जिल्ह्यात उरण (Uran) येथील रिक्त पद भरण्यात आले. मात्र महाड (Mahad) येथील उपविभागीय पद रिक्त ठेवण्यात आले. या पदाचा पदभार शाखा अभियंता यांच्याकडेच देण्यात आला आहे. मागील काही वर्षात महाड सार्वजनिक बांधकाम उपविभागाअंतर्गत योजना, बाह्यतर कामांमध्ये तसेच नुकत्याच आलेल्या पुरामध्ये (flood) नुकसान झालेल्या पुलांसाठी, रस्त्यांसाठी, शासकीय कार्यालयांसाठी शासकीय वसाहती, शासकीय इमारती, पोलीस ठाण्याच्या इमारती, यांच्या दुरुस्ती आणि नूतनीकरणाची कामे मंजुर करून आणण्यात शाखा अभियंता यांची हातखंडा वापरला आहे. आपल्या मर्जीतील ठेकेदारांना (contractor) ऑफलाईन पद्धतीने कामांची जुळवाजुळव केली जात आहे.

शाखा अभियंता तयार करत असलेल्या कामांना हेच शाखा अभियंता उपविभागीय अधिकारी म्हणून सह्या करून कामे आणि बिल मंजुरीसाठी पाठवत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचा कारभार जाणीवपूर्वक तयार केलेला कारभार असल्याची चर्चा सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here