आठवडाभरापासून पावसाची दांडी

दुष्काळाची चाहूल ?

By मिलिंद माने

महाड: संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यात धोकादायक वाटणारा पाऊस (rain) अचानक गायब झाल्याने तालुक्यातील नद्यांनी तळ गाठला आहे. जवळपास आठवडाभरापासून पावसाने दांडी मारल्याने वातावरणात निर्माण झालेल्या उष्म्याने नागरिक हैराण झाले आहेत. तर कडक उन्हाने शेतकरी देखील चिंतेत सापडला आहे. कोकणातील (Konkan) भौगोलिक स्थितीनुसार पावसाचे पडणारे पाणी पाऊस थांबताच थेट नदीला जावून मिळते. यामुळे बहुतांश नद्या आणि नाले कोरडे पडू लागले आहेत.

महाडसह (Mahad) संपूर्ण कोकणात पावसाचे प्रमाण अधिक आहे. महाड आणि पोलादपूरमध्ये तर पावसाची मुसळधार असते. दोन्ही तालुक्यात सरासरी 3 ते ४ हजार मिमी पावसाची नोंद होते. तालुक्यातील उंच भागात पावसाचे प्रमाण यापेक्षा वेगळे आहे. महाड तालुक्याच्या शेजारी असलेल्या महाबळेश्वरमधील पावसाचे प्रमाण याहून अधिक असल्याने येथील पावसाच्या पाण्याचा प्रभाव महाड आणि पोलादपूरमध्ये जाणवतो.

या संपूर्ण भागात लाल मातीचा थर असल्याने लाल मातीच्या गुणधर्मानुसार ही माती पाणी धरून ठेवत नाही. यामुळे या मातीला पाण्याची गरज मोठी आहे. उंच सखल भागामुळे पावसाचे पाणी क्षणात वाहून थेट मोठ्या नद्यांना जावून मिळते. मोठ्या नद्यांचे पाणीदेखील पाऊस आहे तोपर्यंत टिकून राहते. मात्र, पाऊस थोडा थांबला कि नदीची पाण्याची पातळी कमी होते.

जुलै महिन्यात नदीच्या पाण्याची पातळी सातत्याने पडणारा पाऊस कमी होवून देत नाही. मात्र, यावर्षी पावसाने अचानक दांडी मारल्याने महाड तालुक्यातील नद्यांनी तळ गाठला आहे. जून महिन्यात पाऊस उशिराने सुरु झाल्याने आणि जुलै महिन्यात देखील पावसाने मारलेली दांडी यामुळे शेतकऱ्यांच्या भात लावणी देखील लांबणीवर गेली.

भाताला आता पावसाची गरज असल्याने शेतकरी भाताची रोपे करपतात कि काय या भीतीने चिंतेत सापडले आहेत. नद्यांनी एव्हढ्या लवकर तळ गाठल्याने दुष्काळाची चाहूल करून दिली कि काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. महाड तालुक्यातून सावित्री, गांधारी, आणि काळ या नद्या ऐन पावसाळ्यात तुडुंब भरून वाहतात. मात्र, पाऊस कमी होताच तत्काळ तळ गाठतात. गेली आठवडाभर पाऊस पडला नसल्याने नद्यांनी गाठलेला तळ धोक्याचा इशारा देत आहेत.

या वर्षी जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने सुरवात केली. मात्र, हा पाऊस अवेळी असल्याचे हवामान खात्याने निदर्शनास आणून दिले. मोसमी पाऊस सुरु होण्यास संपूर्ण जून महिना गेला. जून महिन्यात महाड तालुक्यात अवघा २९९ मी मी पावसाची नोंद झाली. तर जुलै महिना संपल्यानंतर अवघा १६९ मिमी पाऊस नोंद झाला आहे. यामुळे तालुक्यातील कोथुर्डे, आंबिवली, कुर्ले, धरणातील पाणी साठा पाऊस थांबताच कमी झाला आहे.

ओसंडून वाहणारी धरणे आता मंदावली आहेत. ग्रामीण भागातील नद्या नाल्यांची पातळी कमी झाली असल्याने आणि पावसाचे प्रमाण असेच राहिले तर पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत लवकरच आटून जातील अशी शक्यता वर्तवली जात आहे. कोकणात भात पिकाला लागणारा पाऊस, पिण्याचे पाण्याचे स्त्रोत मे महिन्यापर्यंत टिकायचे असतील तर पावसाचे प्रमाणातील सातत्य कायम राहणे गरजेचे आहे.

महाड तालुक्यात सन २००५ मध्ये एकूण पावसाची नोंद ४२२३ मी.मी तर सन २००७ मध्ये ५८९९ मी.मी., २०१९ मध्ये ४३९६ मी.मी., सन २०२० मध्ये ३४४८ मी.मी. सन २०२१ मध्ये ३४२० मी.मी. पाऊस झाला आहे. गेल्या आठवडाभर महाड तालुक्यात २० मी.मी. पेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वरमध्ये देखील पाऊस थंडावला असल्याने सावित्री नदीच्या पाणी पातळीवर फरक पडला आहे. गेली अनेक वर्षात एव्हढा पाऊस पडून देखील तालुक्यात अनेक ठिकाणी पाणीटंचाई जाणवते. यावर्षी मात्र ऐन जुलै महिन्यात कडक उन पडल्याने पिण्याच्या पाण्याची चिंता महाडकर नागरिकांना सतावू लागली आहे.

भात लावणी पंपाच्या पाण्यावर

महाड तालुक्यात पावसाने दांडी मारल्याने भात लावणी देखील खोळंबली आहे. यामुळे तालुक्यात अनेक भागात डीझेल पंप लावून नदीतील पाणी शेतात घेतले जात आहे. याद्वारे रखडलेली भात लावणी पूर्ण केली जात आहे. शेत जमिनीत देखील पाणी नसल्याने जमीनीला भेगा देखील पडू लागल्या आहेत. शेतकऱ्यांच्या अंदाजानुसार सद्या सुरु असलेल्या नक्षत्राला पाणी आवश्यक होते. या नक्षत्रात पाऊस पडण्याची शक्यता होती मात्र ऐन पावसाळ्यात कडक उन पडत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढीस लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here