@maharashtracity
पुरेशी यंत्रणा उपलब्ध न केल्याने महाड मध्ये मोर्चा
महाड (रायगड): महाड शहरात गेली अनेक वर्षापासून येणाऱ्या पुरावर शासनाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांबाबत दिरंगाई होत असल्याने महाडकर नागरिक आक्रमक झाले आहेत. शनिवारी सकाळी नागरिकांच्यावतीने महाड प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
महाड शहरात सातत्याने पूर येत असल्याने व्यापारी आणि नागरिकांचे मोठे नुकसान होते. सन २०२१ मध्ये महाड शहरात महापूर आल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले. या महापुरानंतर महाडच्या पूरपरिस्थितीवर उपाययोजना करण्याबाबत शासन दरबारी योग्य पावले उचलली जात नसल्याने आणि केल्या जाणाऱ्या उपायांबाबत पुरेशी यांत्रिक साधने उपलब्ध होत नसल्याने शनिवारी सकाळी महाड पूर निवारण समितीतर्फे महाड उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चात शेकडो नागरिक सहभागी झाले होते. संपूर्ण बाजारपेठेतून घोषणा देत हा मोर्चा महाड उपविभागीय कार्यालयावर नेण्यात आला. महाडमध्ये या समितीकडून महाड बंदची देखील आवाहन करण्यात आल्याने शहरातील बहुतांश दुकाने दुपारपर्यंत बंद ठेवण्यात आली होती.
शहरात चौक सभा घेत याबाबत जागृती केली जात असून महाडकर नागरिक पूरपरिस्थितीवर आक्रमक झाले असून सद्यस्थितीत सुरु असलेले गाळ काढण्याच्या कामाला गती देण्यात यावी आणि पुरेशी यंत्रणा उपलब्ध करून दिली जावी अशी मागणी या मोर्चादरम्यान करण्यात आली.
शहरातील सर्व पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी, आणि प्रतिष्ठित नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते. शासनाने महाडकर नागरिकांच्या भावनांचा विचार करून सुरु असलेल्या कामाला गती दिली नाही तर पुढील आंदोलन तीव्र असेल असा इशारा देखील दिला.