By सदानंद खोपकर
@maharashtracity
मुंबई
गेले दोन वर्षे कोरोनाशी (corona) लढा देत असतांना सावरलेली उद्योगाची (industries) घडी, चांगल्या पावसाने दिलेला हात आणि त्यातून अर्थव्यवस्थेला (economy) आलेली उर्जितावस्था यामुळेच महाविकास आघाडी सरकारने (MVA) गुरुवारी आर्थिक पाहणी अहवाल सादर करताना राज्याचा विकास दर 12.1 टक्के राहील असा अंदाज वर्तवला होता. मात्र, महसुली उत्पन्न आणि महसुली खर्च याचा ताळमेळ जमवतांना राज्याच्या उत्पन्नात घट होईल हे लक्षात आले. त्यामुळे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज 24 हजार 353 कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प सादर केला.
छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करून, कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग या पंचसूत्रीत राज्याच्या सर्वांगीण विकासाची ग्वाही देत अर्थमंत्री अजित पवार यांनी सन-२०२२-२३ या वर्षाचा व महाविकास आघाडी सरकारचा तिसरा अर्थसंकल्प आज विधानसभेत सादर केला. तर राज्यमंत्री व शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेत मांडला. हा अर्थसंकल्प मांडताना २४ हजार ३५३ कोटी महसुली तूट राहील असा अंदाज अर्थमंत्री पवार यांनी वर्तविला आहे.
अजित पवार म्हणाले, सन २०२२-२३च्या अर्थसंकल्पामध्ये महसूली जमा ४ लाख ३ हजार ४२७ कोटी रुपये व महसूली खर्च ४ लाख २७हजार ७८० कोटी रुपये अंदाजित आहे. अर्थव्यवस्थेची गती मंदावली आहे, याचा उल्लेख करतानाच ,राज्य विकासासाठी शासन प्रयत्नांची पराकाष्ठा करील, अशी ग्वाही त्यांनी दिली.