By विजय साखळकर

@maharashtracity

मन्या सुर्वेची (Manya Surve) कारकीर्द अवघ्या एक तपाची. मन्याची कारकीर्द सुरू झाली १९६९ साली. संपली ११जानेवारी १९८१ रोजी, त्याच्या चकमकीनं (police encounter). ही पहिली चकमक म्हणून संबोधली जाते. मन्या मारला गेला तेव्हा त्याचे वय ३४ वर्षाचे होते.

मन्याची कारकीर्द ऐन भरात होती तेव्हा भविष्यात गाजलेल्या अनेक डाॅनना नुकती कुठे मिसरूड फुटायला लागली होती. १९८० च्या दशकानंतर गुन्हेगारी जगत (underworld) आणि राजकीय विश्व यांच्यात साटेलोटे असण्याची चर्चा गाजली. एका गृह राज्यमंत्र्यांना १९८५ नंतर राजीनामा द्यावा लागला होता. पण मन्याचाही राजकीय लागेबांधा होता आणि या लागेबांध्यानं त्याला पॅरोलवर (Parole) सोडवण्यात मदत केली होती. पॅरोलवर सुटलेला मन्या परत तुरूंगात गेलाच नाही.

१९६९ साली मन्या आणि त्याचा मोठा भाऊ भार्गव यांना एका प्रकरणी अटक झाली. त्यावेळी एकनाथ दाभोळकर यांनी वाॅटरटाईट केस बनवली होती. एकनाथ दाभोळकर एक धडाडीचे आणि नीडर पोलीस अधिकारी म्हणून ओळखले जात. १९६९ साली जातीय दंगलीत (riot) एका बड्या दादाच्या कपाळाचा वेध घेत त्यांनी गोळी झाडली होती व त्याचा परिणाम दंगलीतील हवा निघून जाण्यात झाली होती.

या अधिकाऱ्याचे त्या काळात कौतुक झालं होते तर ‘मार्मिक’ मधून मुंबई- महाराष्ट्राला असे चार-पाच अधिकारी तरी मिळणं आवश्यक असल्याचं मतप्रदर्शन केले गेले होते.

दाभोळकरांवर पोलीस ठाण्यातच मन्यांने हल्ला केला होता, असे म्हटले जाते. इतके डेअरिंग नंतरच्या काळातही कुठल्या टेरर भाईने केलं नव्हतं. याच दाभोळकरांनी त्याची वाॅटरटाईट केस तयार केली. त्यांचा साथीदार होता त्याचा मोठा भाऊ भार्गव.

दांडेकर व दाते यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप त्याच्यावर होता. ते दोघं या प्रकरणात साक्षीदार होते. याखेरीज त्याचाच एक मित्र आल्स हाही साक्षीदार होता. परिणामी न्या. गुप्ते यांच्या न्यायालयात त्याला जन्मठेपेची शिक्षा (Life imprisonment) ठोठावण्यात आली. त्याच वेळी मन्याने भर कोर्टात न्या. गुप्ते, सरकारी वकील गाडगीळ, दांडेकर, दाते आणि दाभोळकर यांना ‘बघून घेण्याची’ धमकी दिली. १९७० सालची ही गोष्ट!

पुढील काही काळात त्यातील काही लोक मरण पावले. एकनाथ दाभोळकर सेवानिवृत्त झाले. दांडेकर यांचे निधन झाले. याच सुमारास मन्यासाठी एका राष्ट्रीय पक्षातील एका प्रभावी आमदाराने मन्या सुर्वे याच्यासाठी पॅरोल मिळावा यासाठी आपलं वजन वापरलं. का? परमेश्वराला माहित! पण या मध्यस्थी बजावणाऱ्या या प्रभावी आमदाराचा मुंबईच्या राजकीय क्षेत्रात आणि शासकीय गोतावळ्यातही दबदबा होता.

पॅरोलवर सुटका झाल्यानंतर मन्या पोलीस खात्याच्या पाहणीनुसार बेपत्ता झाला. ठरल्या मुदतीत तो परत आला नाही. पण त्याची सुटका झाल्याची बातमी येताच साक्ष देणारा आल्स आपला धंदा टाकून पसार झाला. त्याचा धंदा चालू होता. पण तो मन्याच्या भीतीनं धंद्यावर येत नव्हता. मन्या परतला नाही म्हणून त्याच्याही घरावर पोलिसांनी पहारा ठेवला.

पण मन्या कुठं कुठं शोधूनही सापडत नव्हता. काही अधिकाऱ्यांनी मन्याला पकडण्याची तयारीही सुरू केली. पण मन्यामागे असणाऱ्या त्या राजकीय व्यक्तीचा इतका जबर प्रभाव होता की, ती तयारीही अर्ध्यावर राहिली.

त्या काळात मन्याने एक जबर टोळी निर्माण केली. त्याची ती दोस्त मंडळी आधी प्रभादेवी, परळ, दादर आदी परिसरात धुमाकूळ घालू लागली. मग कसाबसा त्याचा अतापता शोधून पोलिसांनी त्याला उचललं.

त्यावेळी त्याने दोन वेळा दाभोळकरांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला होता. तो निष्फळ ठरला. त्याची टोळी फार मोठी नव्हती. शेख मुनीर, उदय शेट्टी, प्रकाश उर्फ शेंडी मिसाळ, किशोर सावंत, बाजीराव सावंत उर्फ बाजा आदी मंडळी त्याच्या टोळीत होती. पण त्याही वेळी मन्या सांगायचा, आपण लाखाच्या खाली रकमेला हातही लावत नाही.

(लेखक विजय साखळकर हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांनी अनेक वर्षे गुन्हेगारी जगताचे वार्तांकन केले आहे.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here