By विजय साखळकर

@maharashtracity

मन्या सुर्वे (Manya Surve) हा चकमकीत मारला गेलेला पहिला गुंड. त्याच्या चकमकीनंतर जवळपास महिनाभर मन्या सुर्वेविषयी अनेक उलटसुलट बातम्या प्रसिध्दी माध्यमातून येत होत्या. प्रख्यात मराठी दैनिकही त्याला अपवाद नव्हते. मन्या सुर्वेला नवी मुंबई (Navi Mumbai) अथवा पनवेल (Panvel) येथून आणण्यात आले आणि त्याला डाॅ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयासमोर आणून सोडण्यात आले आणि तो जात असतांना मागून गोळ्या झाडण्यात आल्या, अशी शंका एका दैनिकाने व्यक्त केली होती.

तर एक पत्र एका प्रसिद्ध साप्ताहिकात कुणीतरी पाठवले होते. त्यात म्हटले होते की मन्याचा घायाळ देह समोर ठेवला गेल्यावर याला जिवंत का ठेवलात, असे कनिष्ठ अधिकाऱ्यांना जाब विचारत बड्या अधिकाऱ्याने पाठ फिरवली, अशा आशयाचा मजकूर होता. त्यावेळच्या संपादकीय विभाग प्रमुखांनी वादात पडायचे नाही, असे सांगून त्या पत्राची माझ्या समक्ष विल्हेवाट लावली.

पण मन्या सुर्वे याचा विषय तापता राहिल्याने वर्षा पब्लिकेशन्सचे मालक भुत्ता शेठ यांनी विचारणा केली व असे ढासू रिपोर्ट करण्यात वाकबगार असणाऱ्या पंढरीनाथ सावंत यांनी मन्याची माहिती काढून लिहिण्याची सुपारी घेतली.

मन्या त्यावेळी प्रभादेवी (Prabhadevi) चौकात राहायचा. त्याच्या घरासमोर पोलिसांचा (Mumbai Police) चोवीस तास पहारा होता. मन्या रात्री गपचूप आपल्या घरी येऊन जातो, अशी वदंता असल्याने हा पहारा होता. पण पोलीस पुढे बसायचे आणि मन्या मागच्या खिडकीतून जातो, असेही लोक शपथेवर सांगत.

मन्या सुर्वे याच्या एरियात पास्कू उर्फ पास्कल याचा अड्डा होता आणि स्थानिक परिसरातील बहुतेक दादांशी त्याचे जमत नसे. छपरा बिल्डिंगसमोर उभा राहणारा सुहास भाटकर उर्फ पोत्या हा देखिल त्याच्यावर डाव ठेवून होता, अशी माहिती पंढरीनाथ सावंत (Pandharinath Sawant) यांनी पहिल्याच दिवशी आणली.

दुसऱ्या दिवशी सावंतानी आणलेली माहिती अधिक धक्कादायक होती. मन्या आणि भार्गवचे वडिल अर्जुन हे त्या परिसरातील मोठे प्रस्थ होते. प्रतिस्पर्धी टोळीकडून अर्जुन यांची हत्या झाली होत व त्याचा सूड उगवण्यासाठी आधी भार्गव आणि नंतर मन्या मैदानात उतरले.

त्या काळात संघटित गुंडगिरीचा चेहरा तयार झाला नव्हता. मुंबईत वेगवेगळ्या भागात वेगवेगळया टोळ्या होत्या आणि त्यांचे आपापसातील वैर पराकोटीला जात असे. टोळ्यांचा मुख्य व्यवसाय हा आपल्या परिसरातील बेकायदा धंद्यांना संरक्षण पुरवणे, गावठी दारू अड्डयांकडून प्रोटेक्शन मनी (protection money) उकळणे आणि तस्करी टोळ्याचा माल आपापल्या एरियातून जात असतांना त्यांना संरक्षण पुरविणे हा होता.

दूध सेंटरवर जमा झालेला पैसा लुटणे किंवा तो भरणा करण्यासाठी जात असतांना लांबविणे आणि तस्करी (smugling) बंद झाल्यानं एखाद्या नव्या स्रोताच्या शोधात स्थानिक टोळ्या होत्या.

स्थानिक टोळ्यांना नवा स्रोत मिळाला तो भवननिर्माते उर्फ बिल्डरमंडळींना (builders) संरक्षण पुरविण्याचा. त्याच काळात एक नवा स्रोत सुरू झाला तो मटका अड्डे लुटण्याचा. पण मन्यानं मात्र दूध सेंटर्सवर लक्ष्य केंद्रीत केलं होतं. शिवाय झटकन श्रीमंत झालेल्या आणि होणाऱ्यांकडून खंडणी उकळण्याचा.

आपल्यावर अन्याय झाला अशी मन्या आणि भार्गव यांची धारणा होती. या अन्यायाचे निराकरण राज्याकडून होणार नाही. त्यासाठी केंन्द्राकडूनच दबाव येणं आवश्यक असल्याचं मत त्यानं स्वत:शी करून घेतले होते. त्याने केंद्र सरकारमध्ये संपर्क साधण्याचा प्रयत्न ही केला होता असे सांगितले जाते. पण हा बेत सफल होण्याआधी त्याची चकमक झाली, असे म्हटले गेले.

मन्याची एक प्रेयसी होती. तिला तो नियमित भेटत असे. पण मन्याची ही प्रेयसी कोण, ते कधी बाहेर आले नाही. मुंबई पोलिसांनी त्याची ही प्रेयसी शोधून काढली आणि तिला मन्याला बोलावण्यास भाग पाडले व त्याची चकमक घडवून आणली असा एक मतप्रवाह काही पत्रकारांमध्ये होता. ती अशक्य कोटीतील गोष्ट वाटते. मन्या हा इतका चलाख होता की कुठेही दगाफटका असल्याची शंका त्याला आधी येत असे. एकदा असे संकेत मिळाले की तो त्या ठिकाणी जाणंही टाळत असायचा.

यातील आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजच्याइतकी संपर्क यंत्रणा तत्पर नव्हती. नवी मुंबई, पनवेलमधून मन्या मुंबईत यायचा व त्याची प्रेयसी त्याला भेटायची ही गोष्ट जुळवलेली वाटते. मन्याची प्रेयसी होती व ती मन्याची वाट पाहत होती ही गोष्ट खरीही होती. पण तिला पुढे ढकलून पोलीस मन्याची वाट पाहत होते हे खरं वाटत नाही. कारण मन्याच्या चकमकीत सहभागी असणाऱ्या एका अधिकाऱ्याने मन्या आणि त्याची प्रेयसी भेटणार होती हे मान्य केले. पण मन्याला पोलिसांनी तिच्यावरून कसे ओळखले? मन्याची चकमक नेमकी कशी झाली….हे पुढील अंकी..

(लेखक विजय साखळकर हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांनी अनेक वर्षे गुन्हेगारी जगताचे वृत्तांकन केले आहे.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here