By विजय साखळकर

@maharashtracity

मुंबई अंडरवर्ल्डच्या (Mumbai Underworld) इतिहासात सर्वाधिक टोपणनावं मस्तानला (Mastan) पडली आहेत. अगदी सुरुवातीला तो त्याच्या नावाने ओळखला जात होता. नंतर ‘गोदी का चूहा ‘ म्हणून त्याला ओळखलं जाऊ लागलं. पुढे तो बाबा म्हणून ओळखला जाऊ लागला. कारण त्याची कुठल्याही तरुण मुलाला….यह मेरे बेटे जैसा है.. म्हणायचा.

तो बाबा झाला आणि बाकी त्याची मानलेली मुलं. हजला जाऊन आल्यावर तो हाजी मस्तान (Haji Mastan) म्हणूनच ओळखला जाऊ लागला.

बिल्ला नंबर ७८६

गोदीतील‌ स्फोटानंतर (Blast in Dock) मस्तानच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. मुसाफिरखान्याजवळ तो पुन्हा आला तेव्हा उशाला घेऊन झोपायचा त्या मडक्याच्या खापरा इतस्ततः पसरल्या होत्या. आतील पैशांचा मागमूसही नव्हता. त्याचा नेहमीसारखा चिक्की विकण्याचा व्यवसाय त्यानं सुरू केला.

त्याचं एक नेहमीचं गिऱ्हाईक होतं. ज्याला तो गुरुवारी शेंगदाण्याची चिक्की देत असे. कारण गुरुवार हा त्याचा उपासाचा दिवस असायचा. त्यामुळे यादिवशी तो चिक्की घेत नसे. मस्ताननं शेंगदाण्याची चिक्की पुढे केली तेव्हा त्यानं त्याच्या कडक उपासाबद्दल सांगितलं.

कोणत्याही धान्याचा स्पर्श त्याच्या उपवासाच्या खाण्याला झालेला चालत नसे. तेव्हापासून दर गुरुवारी सकाळी चिक्की घेताना मस्तान प्रथम शेंगदाण्याच्या चिक्कीचं पार्सल बांधून घेई. नंतर इतर चिक्की. चिक्की देतावेळीही तो वेष्टनही त्या माणसाकडून काढून घेई. त्यानं चिक्की घेतली की तो बाकीची चिक्की विक्रीसाठी ठेवायचा.

या माणसाजवळ मस्तान बोलला होता…..पढा लिखा जादा नही लेकिन काम इमानदारीसे कर सकता हूं…

याला तो अफसरबाबू म्हणायचा. या अफसरबाबूच्या शिफारशीनं तो गोदीत चिकटला. मजूर, कुली म्हणून. त्याच्या बिल्ल्यावर नेमका ७८६ हा नंबर आला, असं बहुतेकांनी लिहिलं आहे.

प्रत्यक्षात बिल्ला पहिल्या दिवसापासून मिळत नाही. तो नंतर मिळतो. मस्तानच्या जवळची माणसं सांगतात की त्यानं बिल्ल्यावर ७८६ नंबर मिळवला. कारण त्याची ७८६ अर्थात बिस्मिल्लावर फार श्रद्धा. म्हणून त्यानं हा नंबर बिल्ल्यावर मिळवून घेतला.

मस्तान पूर्वापार चौकस. त्यामुळे गोदीतलं काम हेच त्याचं सर्वस्व नव्हतं. फावल्या वेळात तो गोदी आणि परिसर हिंडत राही. त्यामुळे त्याला तो सगळा परिसर ओळखीचा झाला होता. गोदीतल्या सगळ्या चोरवाटा त्याला माहीत झाल्या होत्या. त्यामुळे त्याला ‘गोदी का चूहा’ म्हणून ओळखलं जाई.

मस्तान तसा बोलघेवडा. त्यामुळे त्याची पटकन कुणाशीही नाडी जुळायची. अशा परिस्थितीत त्याची भेट एका कंत्राटदाराशी झाली. तो जहाजांच्या, बोटींच्या चिमण्या साफ करायची कंत्राटं घ्यायचा. मस्तान त्याच्या मनात भरला.

लहान चणीचा मस्तान ही कामं करण्यास अत्यंत उपयुक्त असल्याचं या कंत्राटदाराच्या ध्यानात आलं. कंत्राटदारानं त्याला थेट ऑफर दिली.

काम कधी सुरू होणार असे कंत्राटदाराने विचारल्यावर गोदीतलं काम संपलं की काम करता येईल, अशी अट मस्ताननं ठेवली. कंत्राटदारानं ती मान्य केली. गोदीतलं काम संपल्यावर होडक्यानं त्याला समुद्रात नेलं जाणार होतं आणि काम संपल्यावर किनाऱ्याला आणून सोडणार. तेथून टॅक्सीनं राहण्याच्या ठिकाणी जाण्याचं भाडं दिलं जाणार.

मस्तानला ही ऑफर पसंत पडली. त्यानं होकार दिला. दुसऱ्या दिवसापासून काम सुरू झालं. जहाजांच्या चिमण्या साफ करणं हे काम तसं जिकिरीचं. सतत चालू राहिल्यामुळे धुरांड्यात कार्बन जमा होत असे. तो वेळीच साफ केला तर ठीक नाहीतर वेग मंदावू शकतो. ही काजळी समुद्रात आत खोलवर असताना जलयान बंद पाडू शकते व तिथं मदत मिळणं अशक्य असेल तर जहाज बुडू शकते.

धुरांड्यात असणारी काजळी काढण्यात १० ते १५ टक्के धूर राहू शकत असे. पण मस्तान जेव्हा एखादं धुरांडं साफ करे, तेव्हा त्यात धूर राहत नसे. अख्खंच्या अख्खं धुराडं पूर्णपणे साफ होत असे. आतून आरशासारखं लख्खं. कारण मस्तान धुरांड्यात उतरत असे. त्याच्या लहान चणीमुळे ते शक्य होत असे. कारण तो आत उतरायचा. बाकीचे सर्व बाहेरून करायचे. कारण त्याचं शरीर. त्याचं शरीर आत उतरू देत नसे.

हा सर्व प्रकार सुरू असतानाच मस्तानला गुन्हेगारी जगतात ‘गोदी का चूहा’ म्हणून ओळखले जाऊ लागले होते.

(पुढील अंकी अंडरवर्ल्डमधील मस्तानची कारकीर्द)

(लेखक विजय साखळकर हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांनी अनेक वर्षे गुन्हेगारी जगताचे वार्तांकन केले आहे.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here