By Vijay Sakhalkar

@maharashtracity

युसूफ पटेल (Yusuf Patel) आणि मस्तान (Haji Mastan) यांच्यातील वाद मिटला. दोघांचेही स्वतंत्र व्यवसाय सुरू झाले. मस्तानला या प्रकरणात अटक झाली होती. पण पुढे केस चालली नाही.

एकाएकी बिहारमधील (Bihar) वातावरण तापत गेलं. जयप्रकाश ना‌रायण (Jayaprakash Narayan – JP) यांनी संपूर्ण क्रातीची हाक दिली आणि बिहारात तत्कालिन विद्यार्थी नेते लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्या नेतृत्वाखाली बिहारातील तरुणाई या आंदोलनाशी जोडली गेली.

पुढे संपूर्ण भारतभर हे आंदोलन पसरत गेलं. त्यातच राजनारायण यांनी दाखल केलेल्या पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्या विरोधातील खटल्याचा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा (Allahabad High Court) निकाल इंदिराजींविरोधात गेला.

त्याच काळात पोलीस आणि सैन्य दलातील जवानांनी बेकायदा आज्ञा पाळू नयेत असे आवाहन जयप्रकाश नारायण यांनी केल्यानंतर अंतर्गत आणीबाणीची (Emergency) घोषणा इंदिरा गांधी यांनी केली. पहिल्यानं राजकीय नेते स्थानबद्ध करण्यात आले. नंतर तस्कर, संघटित गुन्हेगार, कायद्याच्या चौकटीत अडकत नसणारे पण बेकायदा कामात सहभागी असणाऱ्यांवर नांगर फिरू लागला. मस्तान, वर्धराज मुदलियार (Varadraj Mudaliar) असे तस्कर-ए- हिंद आत धाडले गेले. रात्री मात्र तो ‘भुल्ला’ जायचा.

त्याच्या या काळातील तुरूंगातील वातावरण एकदम कडक….एक किस्सा वाचनीय आहे. एक तस्कर पकडला गेला…जामीन तर नव्हताच…मग त्याला हृदयविकाराचा झटका (heart attack) आला. त्याच्यावर उपचार फार मोठा हृदय शल्यविशारद करीत होता. उपचार सुरू असताना दिवसा तो झोपून असे. आतली व्यवस्था चोख होती.

त्या तस्कराची व्यवस्था मात्र व्हिटॅमिन ‘एम’ सांभाळत होतं. हस्ते- परहस्ते या तस्कराच्या युक्तीची भणक वरच्या मंडळींपर्यंत गेली. सापळा रचण्यात आला. बेसावध असणारा तो तस्कर नेहमीप्रमाणे सकाळी परतला तेव्हा पोलीस अधिकारी त्याची वाट पाहत इस्पितळात हजर होते.

गुलच्छर्रै उडवून तस्कर सरकार परतले तेव्हा त्याच्या स्वागतासाठी वेगवेगळी पथकं हजर होती. त्यांनी त्या तस्कराला पुन्हा आत टाकलं त्याला आजारी असण्याचं, ह्दय खराब असल्यानं डाॅक्टरांच्या सतत देखरेखीखाली राहण्याची गरज असल्याचं प्रमाणपत्र देणाऱ्या डाॅक्टराला मात्र पार दिल्लीपर्यंत धावाधाव करून स्वत:चा बचाव करण्याची वेळ आली.

Also Read: मस्तान आणि पटेलमधील तस्करी वाद

त्यामुळे इस्पितळात नसणाऱ्या पण तुरुंगात वावरणाऱ्या मस्तानचा प्राण बाहेर येण्यासाठी तळमळत होता. मस्तानची सर्वच क्षेत्रातील टाॅपच्या लोकांशी ओळख होती. वेळोवेळी तो त्यांना उपयोगीही पडला होता. त्यांचाही मस्तानवर जीव होता.‌ त्यामुळे त्याला भेटण्यासाठी म्हणून सर्वच क्षेत्रातील मंडळी येत असतं. अगदी राजकीय व्यक्तीही येत असत.

त्यापैकी काॅग्रेस (Congress) आणि विशेष करून इंदिराजींच्या कानाशी लागू शकणा-या राजकीय व्यक्तींशी मस्तान सर्रास सांगायचा अत्यंत भाबडेपणानं……. मुझे सीर्फ बाहर लाओ… देशपर जितना भी कर्जा है वह मै एक चुंटकी मे वापस कर दूंगा!

हा मस्तानचा भाबडेपणा. त्याला देशांवरचं कर्ज, देशांचे एकमेकांशी आर्थिक व्यवहार कसे होतात त्याची माहिती नव्हती. त्याचा व्यवहार तस्करी होता. तिथं धातुच्या बदल्यात धातु हा व्यवहार होता. मसूर डाळीची एक गोण टी्व्ही देते हा विनिमय दर त्याला कळत असायचा. पण भाबडेपण आणि देशप्रेम एकाच वेळी त्यानं दाखवलं.

जेव्हा आणीबाणी शिथिल झाली तेव्हा मस्तानची सुटका झाली. पण अनेक प्रकरणे प्रलंबित होती. मुख्य म्हणजे त्याची मालमत्ता जप्त होती ती सोडवून घेण्यात आली.

आणीबाणी उठली आणि नंतर रीतसर निवडणूक लागली. दोन वर्षे स्वातंत्र्याची गळचेपी पाहत जगणाऱ्या लोकांनी सरकार बदललं. ‘जनता’ सरकार आलं. नव्या सरकारच्या काही आर्थिक धोरणांमुळे भारत आणि आंतरराष्ट्रीय आणि भारतीय बाजारातील सोन्याच्या किमतीची तफावत ३०० रुपयांवरून ४० रुपयांपर्यंत खाली आली. त्यामुळे सोने तस्करी (Gold smuggling) किफायतशीर राहिली नाही.

त्याच दरम्यान, लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी तस्करांनी देशउभारणीसाठी व्यवसाय बंद करण्याचे आवाहन केले. दुसरा व्यवसाय करण्याची विनंती केली. त्याला प्रतिसाद देऊन १४ बड्या तस्करांनी दिल्ली येथे त्यांच्यासमोर शपथ घेतली.

त्यामुळे तस्करी बंद पडली….? बिलकुल नाही….! सोन्याऐवजी इलेक्ट्रांनिक वस्तू, फॅन्सी कापडे, सिगरेटस्, चाॅकलेटस् असा माल येऊ लागला. मस्तान आणि त्याच्या दोस्तांनी मात्र भवन निर्माता किंवा बांधकाम व्यवसायात उतरण्याचा पर्याय निवडला. त्याचा अंदाज अचूक होता.

मस्तानचा आणखी मोठा सन्मान म्हणजे सरकारी प्रसार माध्यम दूरदर्शनवरून (Doordarshan) तस्करी संबधात त्याची मुलाखतही प्रसारीत झाली. याच सुमारास त्याच्या मनात राजकीय महत्त्वकांक्षा रूजत गेली.

(लेखक विजय साखळकर हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांनी अनेक वर्षे गुन्हेगारी जगताचे वृत्तांकन केले आहे.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here