@maharashtracity

२७ दिवसांपासून अस्थायी प्राध्यापकांचे साखळी उपाेषण सुरुच

मुंबई: महाराष्ट्रातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (government medical colleges) इतिहासात प्रथमच एमबीबीएसच्या विद्यार्थांना (MBBS students) शिक्षकांचे दर्शन झाले नाही. साेमवारी राज्यात प्रथमच एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या लेक्चरला मुकावे लागल्याची खंत वैद्यकीय शिक्षण विभागात (Medical Education Department) व्यक्त हाेत आहे.

काेराेनाचा (corona) प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर एमबीबीएसच्या विद्यार्थांना गुरुंचे मौलिक मार्गदर्शन उज्जल भविष्यासाठी मिळणे अपेक्षित होते. परंतु, वैद्यकीय शिक्षकांच्या आंदोलनाची राज्य सरकारने दखल न घेतल्याने एमबीबीएसच्या विद्यार्थांना साेमवारी शिक्षकांचे दर्शन झाले नाही.

दरम्यान, सरकारने अस्थायी सहाय्यक प्राध्यापकांच्या सेवा नियमित करणे व सातवा वेतन आयोग लागू करणे या प्रमुख मागण्यांची दखल न घेतल्याने आंदोलन चिघळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राज्य सरकार वैद्यकीय शिक्षकांच्या मागण्यांबाबत एवढे असंवेदनशील का? असा सवाल प्राध्यापक करत आहेत.

एमबीबीएस वर्गासाठी प्रवेश घेणारे विद्यार्थी गुणवत्ताधारक असतात. अथक प्रयत्नांमुळे त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळालेला असतो. वैद्यकीय शिक्षण हे स्वप्नवत असताना सरकारतर्फे एवढा हलगर्जीपणा का? अशी संतप्त प्रतिक्रिया विद्यार्थी व पालकांमध्ये व्यक्त हाेत आहे.

दरम्यान, मागील २७ दिवसांपासून साखळी उपोषण करण्याची वेळ शिक्षकांवर येत आहे यापेक्षा दुर्देवाची गोष्ट काय? असा सवाल शिक्षकांकडून केला जात आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी दखल घेणे गरजेचे आहे.

वैद्यकीय शिक्षक (medical teachers) हे समाजात देवदूतांना घडवण्याचे काम करतात. परंतु, हेच द्रोणाचार्य असे उपेक्षित राहणार का? असा संतप्त सवाल महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेचे सचिव डॉ समीर गोलावार यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here