@maharashtracity

मुंबई: काळबादेवी येथे म्हाडाची तळमजला अधिक चार मजली जुनी इमारत ( इमारत क्रमांक ५) रविवारी रात्री अचानक कोसळली. या दुर्घटनेत सूंदर साव (६१) ही व्यक्ती गंभीर जखमी झाल्याने मृत पावली आहे. (Mhada building collapsed)

प्रसंगावधान राखल्याने व वेळीच सतर्कता दाखवत इमारतीबाहेर धाव घेतल्याने इमारतीमध्ये दागिन्यांचे काम करणाऱ्या अनेक कारागिरांचे प्राण वाचले आहेत.

या कोसळलेल्या इमारतीचा ढिगारा उपसण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. यासंदर्भातील माहिती भाजपचे स्थानिक नगरसेवक आकाश पुरोहित (BJP Corporator Akash Purohit) यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली.

प्राप्त माहितीनुसार, काळबादेवी, दादी सेठ अग्यारी लेन, खांडराव वाडी येथील व्यवसायिक वापरात असलेली म्हाडाची तळमजला अधिक चार मजली इमारत काल रात्रीपर्यंत अस्तित्वात होती. या इमारतीत सोन्याचे, फॅन्सी दागिने बनविणारे बंगाली कारागीर सुवर्णकाम करीत असत.

या इमारतीमधील दोन घरांचा निवासासाठी वापर होत असे. इमारतीच्या उर्वरित सर्व भागाचा वापर हा बंगाली कारागीर व्यवसायासाठी करीत होते, अशी माहिती नगरसेवक आकाश पुरोहित यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली.

रविवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास इमारत कोसळायला सुरुवात झाली. प्रथम या इमारतीच्या तिसऱ्या व चौथ्या मजल्यावरील शौचालयाचा भाग कोसळला. त्याबरोबर इमारतीत काम करणारे सर्व बंगाली कारागीर सतर्क झाले.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास इमारतीमधील बंगाली कारागिरांना सुरक्षिततेच्या दृष्टीने इमारतीच्या बाहेर काढून इमारत पूर्णपणे रिकामी केली.

त्यानंतर रात्री ९.३० वाजेच्या सुमारास ही इमारत पूर्णपणे कोसळली. दुर्दैवाने इमारत कोसळली त्यावेळी त्याठिकाणी सूंदर साव (६१) हा कारागीर मोबाईलवर बोलत होता. तो मोबाईलवर बोलत असतानाच इमारत कोसळली. त्याच्या लक्षातही आले. मात्र, तो सावध होण्यापूर्वीच व त्याने तेथून पळ काढेपर्यंत त्याला काळाने गाठले.

हा कारागीर त्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली सापडून गंभीर जखमी झाला व दुर्दैवाने मृत्यूमुखी पडला. ही घटना सीसी कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

सुदैवाने इतर अनेक बंगाली कारागीर हे वेळीच सतर्कता दाखवल्याने बचावले. यावेळी, इमारतीच्या शेजारी उभारलेल्या गणपती मंडपाचेही नुकसान झाल्याचे नगरसेवक आकाश पुरोहित यांनी सांगितले.

ही म्हाडाची इमारत काहीशी जुनी इमारत होती. या इमारतीला अगोदरच काही ठिकाणी तडे गेले होते. तसेच, यापूर्वीही या इमारतीचा काही भाग पडल्याची घटना घडल्याचे समजते. या इमारतीत दागिन्यांचे काम करणारे बंगाली कारागीर त्यांचा व्यवसाय करताना रसायनांचा वापर करीत असत. त्यामुळे त्यापासून निर्माण होणारा धूर सतत बाहेर पडत असे.

तसेच, पावसाळ्यात सतत पाण्याचा मारा होऊन इमारतीच्या ज्या भागात तडे गेले होते त्या भागात अधिक प्रमाणात पाणी शिरून इमारत अधिक जीर्ण झाल्याने व कमजोर झाल्याने ही दुर्घटना घडली असावी, अशी शक्यता नगरसेवक आकाश पुरोहित यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य हाती घेतले. तर पालिका वार्ड स्तरावरील कर्मचारी, म्हाडाचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत कोसळलेल्या इमारतीचा ढिगारा उपसण्याचे काम सुरू होते.

ही दुर्घटना का व कशी काय घडली याबाबत स्थानिक पोलीस, म्हाडा अधिकारी, पालिका प्रशासन, अग्निशमन दलाचे अधिकारी तपास करीत आहेत.

या दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या परिसरात अस्तित्वात असलेली म्हाडाची इमारत क्रमांक ११ ही तळमजला अधिक चार मजली रिकामी इमारत जीर्ण व धोकादायक स्थितीत असून कोणत्याही क्षणी कोसळून मोठी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे या इमारतीच्या पाडकामाबाबत अगोदरच योग्य तो निर्णय घ्यायला हवाय.

ही इमारत कोसळल्यास त्यात कोणतीही जीवित हानी होणार नाही, याची खबरदारी, काळजी घेणे गरजेचे आहे, असे नगरसेवक आकाश पुरोहित यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here