@maharashtracity
एनएसजीसह राज्य राखीव पोलीस आणि मुंबई पोलीसांचा संयुक्त सराव
By अनंत नलावडे
मुंबई: प्रजासत्ताक दिनाच्या (R-Day) पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांकडून संभाव्य हल्ल्याची शक्यता गृहीत धरून अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे सरावाचा भाग म्हणून राष्ट्रीय सुरक्षा गार्डकडून (National Security Guard – NSG) आज रात्री 11 वाजेपासून मंत्रालय (Mantralaya) आणि परिसरात मॉकड्रिल (mock drill) करण्यात येणार आहे.
रात्री 11 वाजेपासून सुरू होणारे हे मॉकड्रिल पहाटे 4 वाजेपर्यंत चालण्याची शक्यता आहे. यासाठी राजभावनपासून (Raj Bhavan) मरीन ड्राइव (Marine Drive) ते मंत्रालय आणि परिसर वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला जाईल असे समजते.
एनएसजीसह राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या, मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यातील पोलीस दल आणि प्रशिक्षित स्नायपर्स (snipers) या मॉकड्रिलमध्ये सहभागी होतील. या संपूर्ण सरावाचे नियंत्रण मंत्रालयातून केले जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी 7 वाजेनंतर मंत्रालयात बाहेरील व्यक्ती आणि वाहनांना प्रवेश बंद करण्यात आले. मंत्रालयात उशिरापर्यंत थांबून काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या वाहन चालकांना मोबाईल वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे.
सरावाचा भाग म्हणून मंत्रालय समोरील आणि मागील सर्व शासकीय आणि खाजगी इमारतीच्या टेरेसचा ताबा स्नायपर्स घेतील. त्यानंतर मंत्रालयात मॉकड्रिल सुरू होईल.
या कारवाईचा हेतू सुरक्षा यंत्रणाना अलर्ट देण्याचा असून त्या अंतर्गत मंत्रालयाची सुरक्षा व्यवस्था चौकस करण्यात आली आहे.
मंत्रालयाच्या परिसरातील सर्व हाय राईज इमारतींपासून विधानभवन, मंत्री निवासस्थाने, आकाशवाणी आमदार निवास या परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास हा मॉकड्रिलचा थरार अनुभवला जाणार आहे, असेही या सूत्रांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या सरावाचे चित्रिरकण करण्यास किंवा फ़ोटो काढण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.