@maharashtracity
मुंबई: अखेर रविवारी मान्सून केरळमध्ये दाखल झाला असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून घोषित करण्यात आले. केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची पारंपारिक तारीख १ जून असून तीन दिवस आधीच आला असल्याचे सांगण्यात आले. राज्यात मात्र सोमवारपासून आगामी ४ दिवस दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या लगतच्या काही भागात गडगडाटासहसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
दरम्यान, मान्सून केरळमध्ये दाखल होण्याच्या चिन्हांत पश्चिमेकडील वाऱ्याचा प्रभाव समुद्रसपाटीपासून ४.५ किमी पर्यंत असून पश्चिमेकडील आग्नेय अरबी समुद्रावर वाऱ्याची ताकद वाढली असल्याची नोंद करण्यात आली. तर आग्नेय अरबी समुद्र आणि केरळच्या लगतच्या भागात ढगाळपणा वाढला आहे.
शिवाय केरळमध्ये गेल्या २४ तासांमध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाच्या हालचाली झाल्या असून केरळमध्ये मान्सून सुरू झाल्याचे घोषित करण्यासाठी असलेल्या १४ पर्जन्य निरीक्षण केंद्रांपैकी १० स्थानकांवर २.५ मिमी तसेच त्याहून अधिक पाऊस झाला असल्याचे सांगण्यात आले. हे परिमाण घेऊन केरळमध्ये मान्सून दाखल झाला असल्याचे हवामानशास्त्र विभागाकडून प्रमाणित करण्यात आले.