@maharashtracity
सुधारित नियमावली जारी
मुंबई: राज्य शासनाने शाळा सुरू करण्याबाबत काही कडक मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. (guidelines to reopen schools) शिक्षकांनी लसीचे दोन डोस घेणे आवश्यक आहे. तसेच, शाळा व्यवस्थापन समितीची मान्यता आणि पालकांचे संमतीपत्र (consent of parents) बंधनकारक केले आहे. शाळेत येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांचा कोरोनापासून बचाव होण्यासाठी त्यांच्या सुरक्षिततेबाबत आणि त्यांच्या आरोग्याबाबत विशेष काळजी घेण्यासाठी खास भर देण्यात येणार आहे.
कोरोना नियंत्रणात आल्याने राज्य सरकारने राज्यातील ग्रामीण भागात इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंतच्या आणि शहरी भागात इयत्ता ८ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळा, कॉलेज ४ ऑक्टोबरपासून निर्णय घेतला आहे.
दीड वर्षांनंतर शाळा उघडण्यात येणार असल्याने शाळा परिसर, शालेय इमारत, वर्ग खोल्या यांची स्वछता व सर्वत्र सॅनिटायझर फवारणी (sanitisation) करून जागा निर्जंतुक करण्यावर अधिक भर देण्यात येणार आहे.
यासंदर्भातील माहिती पालिका शिक्षण विभागाचे प्रमुख अधिकारी राजू तडवी यांनी दिली आहे.
शाळेत जर विद्यार्थी संख्या मर्यादेपेक्षाही जास्त वाढल्यास एक दिवस आड करून वर्ग घेण्यात येणार आहे. तसेच, शिक्षक आणि इतर कर्मचार्यांचे लसीकरण पूर्ण झाले की नाही याची पडताळणी करण्यात येणार आहे.
तसेच, प्रारंभी शाळेतून विद्यार्थ्यांना घरी पाठवताना त्यांनी वैक्तिक स्वच्छता कशी राखावी, आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याचे धडे देण्यात येणार आहेत.
मुंबई महापालिका सह आयुक्त ( शिक्षण ) यांनी २९ सप्टेंबर रोजी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यात आवश्यक त्या सर्व सूचना दिलेल्या आहेत. तसेच, शाळा, कॉलेज सुरू करण्यातबाबत जारी केलेल्या नियमावलीचे व सूचनांचे काटेकोपणे पालन करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
परिपत्रकातील ठळक बाबी
शाळा व्यवस्थापन समितीची मान्यता आणि पालकांचे संमतीपत्र अनिवार्य आहे.
शाळेला जवळपासच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी संलग्नीकरण ,
विद्यार्थ्यांना ताप , सर्दी , जोरात श्वासोच्छवास करणारे , शरीरावर ओरखडे , डोळे लाल होणे, ओठ फुटलेले व लाल होणे, बोट , हात, सांधे सुजणे, उलट्या – जुलाब व पोटदुखी होणे, मानसिक आजार आदी आजार, लक्षणे आढळून आल्यास तात्काळ वैद्यकीय उपचार देण्यात येणार आहेत.
शाळा सुरू करण्यापूर्वी त्या शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरणाच्या दोन्ही मात्रा झालेल्या असणे आवश्यक आहे अन्यथा covid – 19 साठीची ४८ तासापूर्वीची आरटीपीसीआर चाचणी करणे आवश्यक असणार आहे.
शालेय विद्यार्थी व कर्मचाऱ्यांसाठी शक्य असल्यास प्रवेशद्वार व निकासीद्वार (Entry & Exit) हे वेगळे ठेवणे. त्यासाठी स्वतंत्र वेळापत्रक निश्चित करणे.
विद्यार्थ्याच्या घरामध्ये कोणी कोरोनाग्रस्त असल्यास विद्यार्थ्यांना शाळेत न बोलविता विलगीकरणात ठेवण्यात येणार.
विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी व्यतिरिक्त बाहेरील व्यक्तीला शाळेत प्रवेश बंदी असेल.
विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी कोरोनाग्रस्त आढळल्यास तात्काळ शाळा बंद करून शाळा निर्जतुकीकरण करण्याची कार्यवाही मुख्याध्यापकांनी करणे व वैद्यकीय उपचार करून घेणे बंधनकारक असेल.
शाळेत न येणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यात येणार आहे.
प्रत्येक वर्गातील एका डेस्क बेंचवर एकच विदयार्थी शारीरिक अंतराचे निकष पाळून झिग – झंग पध्दतीने बसविण्यात येणार आहे.
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी शक्यतो विद्यार्थ्यांची दररोजची बसण्याची जागा निश्चित ठेवण्यात येणार असून प्रत्येक वर्गखोलीच्या बाहेर दरवाज्यालगत वर्गात कोणत्या इयत्तेचे कोणते विद्यार्थी , कोणत्या वेळेत , कोणत्या ठिकाणी बसणार याची माहिती दर्शविण्याची जबाबदारी शिक्षकांनी असणार आहे.
एका वर्गात एकावेळी जास्तीत जास्त पंधरा ते वीस विद्यार्थी बसतील.
विद्यार्थ्यांना शाळेत कमीत कमी पुस्तके किंवा वह्या न्याव्या लागतील.
विद्यार्थ्यांना शाळेतून घरी जाताना व घरी गेल्यावर कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करणे, वैक्तिक स्वच्छता राखणे आवश्यक असणार आहे.