@maharashtracity

मुंबईत कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक कडकपणे राबवा

आयुक्तांचे आदेश

मुंबई: मुंबईत नियंत्रणात आलेला कोविड (covid) व नवीन प्रकारच्या ‘ओमायक्रॉन’ (Omicron) विषाणूने बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. याची गंभीर दखल घेऊन पालिका आयुक्त इकबाल चहल (BMC Commissioner IS Chahal) यांनी, मुंबईत कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना कठोर व अधिक काटेकोरपणे राबविण्यात यावी, असे आदेश पालिका यंत्रणेला विशेष बैठकीत दिले आहेत.

या बैठकीला, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, सुरेश काकाणी, सह आयुक्त (शिक्षण) अजीतकुमार कुंभार, चंद्रशेखर चोरे, उपायुक्त रमाकांत बिरादार, संजय कुऱ्हाडे, अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांच्यासह संबंधीत साहाय्यक आयुक्त / उप आयुक्त, सार्वजनिक आरोग्य खात्याचे अधिकारी, संबंधीत खाते प्रमुख, वरिष्ठ अधिकारी आणि महापालिकेच्या रुग्णालयांचे अधिष्ठाता व संबंधीत तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते.

आरोग्य यंत्रणा सुसज्ज ठेवण्याचे आदेश

कोविडचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी व आवश्यक उपाययोजनांसाठी आयुक्तांनी सोमवारी संबंधित अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन त्यामध्ये कोविडबाबत आढावा घेतला. केंद्र व राज्य शासनाद्वारे वेळोवेळी देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी, अशा सूचना दिल्या.

आयुक्तांनी सांगितले की, पालिका रुग्णालये, जंबो कोविड सेंटर (Jumbo covid Centres) रुग्णांसाठी सज्ज ठेवावीत. त्याचप्रमाणें, कोविड संबंधित औषध, रुग्णखाटा (beds), रुग्णवाहिका (ambulance), रुग्णालयातील मनुष्यबळ, आवश्यक ती साधनसामुग्री, औषधे-गोळ्या-इंजेक्शन्स साठा इत्यादी सर्व बाबींचा आढावा घेऊन संभाव्य गरजेनुसार या बाबी अद्ययावत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

विना मास्क आढळल्यास तीव्र कारवाई

नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. याची गंभीर दखल घेऊन आयुक्तांनी, कोविडला रोखण्यासाठी प्रत्येकाने मास्क घालणे, हात स्वच्छ धुणे व सामाजिक अंतर राखणे या तीन महत्वाच्या नियमांचे पालन होते की नाही, यावर लक्ष केंद्रित करावे अशा सूचना दिल्या.

त्याचप्रमाणे, कोविड प्रतिबंधात्मक उपाय योजनांची अधिक काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी, यासाठी अधिक प्रभावी कार्यवाही कराव्यात असे सांगितले.

सार्वजनिक ठिकाणी विना मास्क आढळून येणाऱ्या नागरिकांवर अधिक तीव्रपणे कारवाई करावी, असे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.

महापालिकेच्या (BMC) सर्व २४ विभागातील ‘विभागीय नियंत्रण कक्ष’ यांच्या कामकाजाचा नियमित आढावा अधिक बारकाईने घेण्यात यावा. मनुष्यबळ, तांत्रिक सेवा-सुविधा इत्यादी बाबींचा आढावा घेऊन गरजेनुसार आवश्यक त्या सुधारणा करण्यात याव्यात. त्याचप्रमाणे सर्व २४ विभागांमध्ये विभागांच्या स्तरावर सर्वंकष आढावा घेऊन सूक्ष्म स्तरीय नियोजन करण्याचे निर्देश दिले.

कोविड बाधा झाल्याची चाचणी लवकरात लवकर होणे हे रुग्णाच्या दृष्टीने व कोविड प्रतिबंधाच्या दृष्टीने आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन महापालिका क्षेत्रात विविध ठिकाणी कोविड चाचणी केंद्रे कार्यरत आहेत. तरी ज्यांना कोविडची लक्षणे असतील, त्यांनी कोविड चाचणी केंद्रात जाऊन कोविड चाचणी करुन घ्यावी.

या अनुषंगाने आपल्या विभागातील कोविड चाचणी केंद्राची (Covid testing center) माहिती ‘वॉर्ड वॉर रुम’द्वारे उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तरी संबंधीत नागरिकांनी आपल्या विभागाच्या वॉर्ड वॉर रुमशी (Ward War Room) संपर्क साधावा, असे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here