@maharashtracity

रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडून सन्मानपत्र

मुंबई: रायगड (Raigad) जिल्ह्यात महाड (Mahad) येथे पूरस्थिती निर्माण होऊन चिखल, कचरा साचला होता. या घटनेनंतर सदर ठिकाणी पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुंबई महापालिकेची (BMC) विविध पथके गेली होती. त्यांनी आपली चोख कामगिरी करून तेथील नागरिकांना मोठा दिलासा दिला.

मुंबई महापालिकेच्या या मदत पथकाचे रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे (Independent Day) औचित्य साधून विशेष कौतुक केले आहे.

“आपल्या धैर्याला सलाम”, असा उल्लेख केलेले सन्मानपत्र पालिकेचे विशेष कार्य अधिकारी सुभाष दळवी यांना प्रदान करण्यात आले.

पुरस्थितीमुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा, चिखल साचला होता. मुंबईहून त्या ठिकाणी यंत्र सामुग्री आणि आवश्यक मनुष्यबळ घेऊन पालिकेचे पथक गेले होते. त्याठिकाणी काही दिवस राहून त्यांनी स्वच्छता सेवा केली व तेथील नागरिकांना मोठा दिलासा दिला.

रायगड जिल्हा पोलीस मुख्यालय, परेड ग्राउंड याठिकाणी १५ ऑगस्ट रोजी सकाळी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी
पालिकेचे विशेष कार्य अधिकारी सुभाष दळवी यांना सन्मानपत्र बहाल केले.

या सन्मान पत्रात, रायगड जिल्ह्यात पोलादपूर, महाड या ठिकाणी २१ व २२ जुलै रोजी अतिवृष्टी होऊन जनजीवन विस्कळीत झाले होते. अशा कठीण प्रसंगात मुंबई महापालिका पथक मदतीला धावून आले. आपण केवळ कर्तव्य म्हणून नाही तर भावनिक व सामाजिक जबाबदारीने अहोरात्र मेहनत घेतली. यासाठी जिल्हा प्रशासन आपले आभार मानत आहे.

आपत्तीच्या काळात मदतीला तत्परतेने धावून येण्याची ही परंपरा आपण यापुढेही कायम ठेवाल, आपल्या धैर्याला सलाम, अशा शब्दात जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी गौरव केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here