@maharashtracity
एक लाख कोटींच्या दिशेने वाटचाल
कोरोनावर ५ हजार कोटींचा खर्च
४ वर्षात १८ हजार कोटी रुपयांची वाढ
जून २०१७ पर्यंत ६४ हजार ४८२ कोटींच्या ठेवी
३१ ऑगस्ट २०२१ पर्यँत बँकात ८२ हजार ४१० कोटींच्या ठेवी
व्याज रकमेत कमालीची घट, फक्त ३% ते ५.२०% व्याज
मुंबई: मुंबई महापालिकेच्या विविध बँकांमध्ये २०१७ पर्यंत ६४ हजार ४८२ कोटी ६४ लाख रुपयांच्या ठेवी होत्या. मात्र ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत या ठेवींमध्ये तब्बल १८ हजार कोटी रुपयांची वाढ होऊन हा आकडा आता ८२,४१०.४४ कोटी रुपयांवर गेला आहे.
या गंगाजळीत अशीच वाढ होत राहिली तर आगामी काही वर्षात मुंबई महापालिका निश्चितच एक लाख कोटी रुपयांच्या मुदत ठेवींचा टप्पा गाठेल.
पालिकेच्या या मुदत ठेवींमध्ये कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी, निवृत्ती वेतन, उपदान निधी, इतर विशेष निधी, कंत्राटदार आणि इतर पक्षकारांची ठेव रक्कम यांचा समावेश आहे.
मुंबई महापालिका (BMC) ही आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका आहे. मुंबई महापालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प ३९ हजार कोटींचा सादर करण्यात आला होता. (Asia’s richest municipal corporation)
पालिकेने मुंबईची वाढती तहान भागविण्यासाठी काही नवीन पाणी प्रकल्प योजिले असून त्यासाठी, कोस्टल रोड, मिठी नदी यांसारखे विकासकामे आदींसाठी पालिकेने काही प्रमाणात निधी राखून ठेवला आहे. त्या निधीचा वापर भविष्यातील प्रस्तावित प्रकल्पांसाठी केला जाणार आहे.
कोरोनावरील उपायांसाठी ५ हजार कोटींचा खर्च
विशेष म्हणजे मुंबईत गेल्या मार्च २०२० पासून जीवघेण्या कोरोनाचे वातावरण आहे. कोरोनाची पहिली, दुसरी लाट परतावून आतापर्यंत कोरोनावरील वैद्यकीय उपाययोजना व अन्य कामांसाठी पालिकेच्या तिजोरीमधून अंदाजे ५ हजार कोटी रुपये खर्च झाला आहे. (Expenses for corona treatment)
मुदत ठेवींमध्ये अशी होतेय वाढ
मुंबई महापालिकेच्या विविध बँकांत जून २०१७ पर्यंत ६४ हजार ४८२ कोटी ६४ लाख रुपयांच्या मुदत ठेवी होत्या. ऑक्टोबर २०१७ मध्ये त्यात वाढ होऊन त्या ६७ हजार ७४१ कोटी ९२ लाख रुपयांवर पोहोचल्या होत्या.
त्यावेळी पालिकेला किमान ५.९५% ते ६.७५% इतके दरसाल व्याज (interest) मिळत होते. मात्र काळाच्या प्रवाहात व्याज दरात घसरण होत गेली. मार्च २०१८ पर्यंत पालिकेच्या विविध बँकात ६९ हजार १३५ कोटी रुपयांच्या मुदत ठेवी होत्या. तर ३० जून २०१९ पर्यंत त्यामध्ये मोठी वाढ होऊन विविध बँकातील मुदत ठेवींची रक्कम ७९ हजार ९१ कोटी ४६ लाख रुपयांवर गेली होती.
पालिकेला विविध बँकातील व्याजापोटी ३ हजार ३१८ कोटींचे व्याज प्राप्त झाले आहे. त्यामुळे पालिकेची विविध बँकातील मुदत ठेवींची रक्कम ८२ हजार ४१० कोटी ४४ लाख रुपयांवर गेली आहे.
पालिकेने गेल्या ऑगस्ट महिन्यात विविध बँकात एक ते दोन वर्षांच्या मुदतीसाठी किमान २ कोटी ते ५३१ कोटी रुपयांच्या मुदत ठेवींची गुंतवणूक केली आहे.
एकूण ९०७१.९९ कोटी रुपयांची गुंतवणूक (investment) करण्यात आली असून त्यापोटी पालिकेला पुढील दोन वर्षात ४२८.३१ कोटी रुपयांचे व्याज मिळणे अपेक्षित आहे.