@maharashtracity

कंत्राटदारांवर कारवाई करणार – महापौर

मुंबई: मुंबई महापालिकेने व कंत्राटदारांनी एप्रिलपासून ते आजपर्यंत विविध रस्त्यांवरील ४२ हजार खड्डे बुजवले आहेत. येत्या १५ दिवसांत सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात येणार आहेत, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. (Mayor assures to fill up all potholes within next 15 days)

तसेच, रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे महापौर पेडणेकर यांनी सांगितले.

त्याचप्रमाणे, आगामी काळात मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त कसे होतील, यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुंबईतील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे मुंबईकरांना त्याचा त्रास होत आहे, हे मी स्वतः खड्डे पडलेल्या ठिकाणी भेट देऊन अनुभवले आहे. तसेच, संबंधित पालिका अधिकाऱ्यांना त्याचा जाब विचारला असून संबंधित कंत्राटदारांवर कारवाई करण्याचे आदेशही दिले आहेत, असे महापौरांनी सांगितले.

या खड्ड्यांवरून विरोधकांनी देखील सदर मुद्दा उचलून धरला आहे. परंतु त्यांनी याचे राजकारण न करता काही गोष्टी सामंजस्याने सोडविण्यासाठी सहकार्य करायला हवे, असे सांगतानाच येत्या १५ दिवासांत मुंबई खड्डेमुक्त करू, असा आत्मविश्वासही महापौर पेडणेकर यांनी यावेळी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here