उपनगर ३७.१ डिग्री सेल्सिअस
@maharashtracity
मुंबई: थंडी टप्प्याटप्प्याने लुप्त होत असते. बुधवारी मुंबई उपनगरातील किमान तापमान १९ डिग्री सेल्सिअसवर म्हणजे थंडी असताना गुरुवारी उपनगरातील कमाल तापमान ३७.१ डिग्री सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले. अचानक झालेल्या या तापमान वाढीमुळे (rise in temperature) आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबई वेधशाळेच्या ज्येष्ठ वैज्ञानिका सुषमा नायर यांनी सांगितले कि, ही वातावरणीय स्थिती साधारण असून घडत असते. मात्र, गुरुवारी अँटी- सायक्लॉन (anti cyclone) स्थिती मुंबईच्या अगदी जवळ निर्माण झाली असल्याने उपनगरातील तापमान अचानक वाढले आहे. दरम्यान आजच्या नोंदीने मुंबईत उकाडा सुरु झाला असल्याचे समोर आले.
गुरुवारी मुंबई उपनगरातील कमाल तापमान ३७.१ तर शहरातील कमाल तापमान ३३.० एवढे नोंदविण्यात आले. त्याच वेळी शहरातील किमान तापमान २२.५ तर उपनगरातील किमान तापमान २२.२ इतके नोंदविण्यात आले. यावर बोलताना वैज्ञानिक सुषमा नायर यांनी सांगितले की, राज्यातील ठराविक ठिकाणी ३७ डिग्री सेल्सिअस एवढे कमाल तापमान नोंदविण्यात आले आहे.
गुरुवारी साऊथ ईस्टर्ली वाऱ्याचा प्रभाव अधिक होता. साऊथ ईस्टर्ली वारे म्हणजे बंगालच्या खाडीवरून येणारे वारे होय. हे वारे मूलतः गरम प्रवाहाचे असते. या वाऱ्याचा प्रभाव अधिक होता. त्याच वेळी अँटी सायक्लॉन स्थिती निर्माण झाली होती. हि स्थिती भू पृष्ठभागापासून वातावरणात अगदी तीन किमी अंतरावर निर्माण झाली होती. शिवाय हि स्थिती मुंबई उपनगराला जवळची होती. या दोन कारणामुळे मुंबई उपनगरातील कमाल तापमान वाढले असल्याचे नायर म्हणाल्या.
अशा प्रकारची वातावरणीय स्थिती घडणे नियमित असून मागच्या महिन्यातदेखील अशी स्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी देखील कमाल तापमान वाढले होते. मात्र थंडीमुळे समजू शकले नसल्याचे सांगण्यात आले. हे शास्त्रीयदृष्ट्या कारण असले तरी मुंबईत उन्हाळा सुरु झाला असल्याचे आजच्या दिवसातील कमाल तापमानाची नोंद सांगून गेली.