@maharashtracity

मुंबई: मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात हिंदमाता, किंग्जसर्कल, सायन, कुर्ला, अंधेरी सब वे, मिलन सब वे आदी ३८६ सखल भागात मुसळधार पावसामुळे पाणी साचत असे. मात्र, पालिकेने पावसाळयात साचणाऱ्या पाण्याचा निचरा जलदगतीने करण्यासाठी आतापर्यंत केलेल्या विविध उपाययोजनांमुळे मुंबईकरांना ३०६ ठिकाणी पावसाळी पाण्याच्या साचण्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे.

आता पुढील पावसाळ्यापूर्वी उर्वरित ८० ठिकाणीही पावसाचे पाणी साचण्यापासून नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याबाबत विविध उपाययोजना करण्यात येणार असल्याची ग्वाही पालिकेने दिली आहे.

मुंबईत दरवर्षी मुसळधार पावसामुळे व त्याचवेळी समुद्रात असलेल्या मोठ्या भरतीमुळे शहर व उपनगरात सखल भागात मोठया प्रमाणात पावसाचे पाणी साचत असे. मात्र, २६ जुलै २००५ रोजीच्या मुंबईतील पूरस्थितीचा मोठा फटका बसल्याने आणि त्यात मोठी जीवित व वित्तीय हानी झाल्याने पालिकेवर सर्व बाजूने टीकेची झोड उठली होती. त्यानंतर पालिका व शासनाने २६ जुलै पुनरावृत्ती टाळण्यासाठी विविध ठिकाणी उपाययोजना केल्या.

यामध्ये, हाजीअली परिसरात, क्लिव्ह लँड, लव्ह ग्रोव्ह, इरला, ब्रिटानिया व गझधरबंध या सहा ठिकाणी मोठ्या क्षमतेचे मोठे मोठे पंपिंग स्टेशन उभारले. आता मोगरा व माहुल या दोन ठिकाणीही मोठे पंपिंग स्टेशन उभारण्याचे काम प्रलंबित आहे. मिठी व इतर नद्या आणि मोठे नाले आदींचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले.

किंग्जसर्कल येथे मिनी पंपिंग स्टेशन उभारल्याने येथील दुकानदार, रहिवाशी आदींना पावसाळी समस्येपासून मोठा दिलासा मिळाला आहे. त्याचप्रमाणे, हिंदमाता येथे दरवर्षी निर्माण होणारी पावसाळी पाण्याची समस्या कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी चार ठिकाणी मोठ्या आकाराच्या भूमिगत पाण्याच्या टाक्या उभारल्याने हिंदमाता परिसरातील दुकानदारांना यंदा पाणी साचण्यापासून मोठा दिलासा मिळाला. मुंबईत आणखीन ज्या ठिकाणी पावसाळी पाणी साचते त्यापासून दिलासा देण्यासाठी पंपिंग व्यवस्था करण्याचे पालिकेचे नियोजन आहे.

मुंबईत जोरदार पावसाप्रसंगी पाणी साचण्याची संभाव्य अशी सुमारे ३८६ ठिकाणे होती. पैकी तब्बल २८२ ठिकाणांवर पाण्याचा निचरा करणाऱ्या उपाययोजना प्रशासनाने यापूर्वीच पूर्ण केल्या होत्या. तर उर्वरित १०४ पैकी यंदा ३१ मे २०२२ पूर्वी आणखी २४ ठिकाणांची कामे पूर्ण करण्यात आली. म्हणजेच आजवर ३०६ ठिकाणांची पावसाळी पाण्याच्या समस्येपासून सुटका झाली आहे. उर्वरित ८० ठिकाणांवरची कामे देखील २०२३ च्या पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या दिशेने वेगाने कार्यवाही सुरु आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here