@maharashtracity

मुंबई: कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षात श्रीगणेशोत्सव साजरा ( Ganesh Festival) करण्यावर खूप कडक बंधने घालण्यात आल्याने गणेशभक्तांच्या उत्साहावर विरजण पडले होते. मात्र यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Pandemic) कमी झाल्याने गणेश भक्त जल्लोषात गणेशोत्सव साजरा करणार आहेत.

राज्यातील शिंदे सरकारने ( Eknath Shinde) तर गणेश मूर्तींवरील बंधने हटवली आहेत. मात्र मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल ( Iqbal Chahal) यांनी यंदाचा श्रीगणेशोत्सव हा कोरोना नियमांचे पालन करून पर्यावरणपूरक अशा पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन गणेश भक्तांना केले आहे.

येत्या ३१ ऑगस्ट रोजी श्रीगणेशाचे आगमन होणार आहे. त्यानंतर दीड, पंकज, सात, दहा, अकरा दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. त्यासाठी श्रीगणेश विसर्जन मिरवणुकांचे मार्ग हे प्राधान्याने सन – २०१९ नुसार ठेवण्याचे यावेत. तसेच, पालिका प्रशासनाने आवश्यक तो जय्यत तयारी करून संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी प्रशासनाला दिले आहेत.

मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी महापालिका व बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती ( शहर व उपनगर) कार्यान्वित आहेत. त्यामुळे पालिकेला गणेश आगमन व विसर्जन निर्विघनपणे करणे सुलभ होते. आता मुंबई महापालिकेच्या २४ विभागांत गणेशोत्सवासाठी स्वतंत्र समन्वय अधिकारी नेमण्याचे आदेश पालिका आयुक्त चहल यांनी प्रशासनाला दिले आहेत.

गणेशोत्सवात श्रीगणेशाचे आगमन व विसर्जन असताना रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे एखादी अप्रिय घटना घडून गणेशोत्सवाला गालबोट लागण्याची शक्यता असते. त्यामुळे गणेशोत्सव निर्विघनपणे पार पाडण्यासाठी रस्ते खात्याने काळजीपूर्वक पाहणी करावी व रस्त्यांवरील लहान – मोठे खड्डे बुजविण्याचे आदेश पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी प्रशासनला यावेळी दिले.

मुंबईत गणेशोत्सव तोंडावर आल्याने या उत्सवाच्या निमित्ताने श्रीगणेश आगमन व विसर्जन याबाबतची पालिका व इतर प्राधिकरण यांच्या समन्वयाने योग्य नियोजन करण्यासाठी पालिका आयुक्त चहल यांच्या अध्यक्षतेखाली पालिका मुख्यालयात सर्वसंबंधीत प्राधिकरण, पालिका अधिकारी, गणेश मंडळे, सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती आदींची महत्वपूर्ण बैठक सोमवारी पार पडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here