@maharashtracity

सोसायट्यांमध्ये कडक अंमलबजावणी

दहीहंडी, गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्तांची कोरोनाबाबत बैठक
कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी सतर्क व सज्ज राहण्याचे आदेश
५ व त्यापेक्षाही जास्त रुग्ण आढळल्यास इमारती ‘सील’
सील इमारतीमध्ये ये – जा करण्यास मनाई
ऑक्सिजन, बेड, औषधे यांबाबत उपाययोजना करण्याचे आदेश

मुंबई: मुंबईत (Mumbai) दहीहंडी, गणेशोत्सव (Ganesh Festival) या सणांच्या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने रुग्ण संख्येतही काहीशी वाढ होत आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते येऊ घातलेली कोरोनाची तिसरी लाट (third wave of corona) पाहता पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी सोमवारी संबंधित पालिका अतिरिक्त आयुक्त, वरिष्ठ अधिकारी, आरोग्य अधिकारी, पोलीस, डॉक्टर आदींची महत्वाची बैठक घेऊन त्यामध्ये कोरोनाच्या सध्याच्या स्थितीचा आढावा घेतला.

मुंबईत कोरोना संसर्ग वाढीबाबत पालिका आयुक्तांनी काहीशी चिंता व्यक्त केली आहे. शहर व उपनगरे येथील झोपडपट्ट्या (slums) व चाळी या जवळजवळ कोरोनामुक्त झाल्या आहेत मात्र, आजही अनेक सोसायट्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या (corona patients) संख्येत वाढ होत असल्याचे समोर आले आहे.

ज्या इमारतीमध्ये कोरोनाची बाधा झालेले ५ अथवा त्यापेक्षा अधिक रुग्ण आढळून येतील त्या इमारती तात्काळ सील करण्यात येत असून यापुढे या सील केलेल्या इमारतीमधून वाहन चालक, कर्मचारी यांना बाहेरून आत जाण्यास व आतील रहिवाशांना बाहेर जाण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे.

एवढेच नव्हे तर अशा सील केलेल्या इमारतींच्या ठिकाणी अगदी पोलीस बंदोबस्त लावण्याचे आदेशही पालिका आयुक्त यांनी प्रशासनाला दिले आहेत.

मंगळवारी दहीहंडी उत्सव असून सप्टेंबरच्या प्रारंभी म्हणजे तोंडावर गणेशोत्सव आला आहे. त्या निमित्ताने गर्दी वाढू नये. कोरोनाबाबत घालून देण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घेण्याबाबत आयुक्तांनी फर्मावल्याचे समजते.

तसेच, कोरोना बाधित रुग्णांवर तात्काळ उपचार करण्यासाठी आवश्यक बेड (beds), औषधे, ऑक्सिजन साठा (oxygen) आदी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याचे व २४ तास सतर्क राहण्याचे आदेश आयुक्तांनी संबंधितांना दिले आहेत.

या बैठकीला, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, पी. वेलरासू, डॉ. संजीव कुमार, सुरेश काकाणी, संबंधित सह आयुक्त, उप आयुक्त, मुंबई पोलीस दलातील उप आयुक्त आदी मान्यवर उपस्थित होते.

मास्क न घालणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई

कोरोनाची दुसरी लाट कशीतरी नियंत्रणात आणणाऱ्या मुंबई महापालिकेने (BMC) कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी प्रशासन, आरोग्य यंत्रणा, रुग्णालये, पोलीस यांनी सतर्क व सज्ज रहावे, असे आदेश पालिका आयुक्त इकबाल चहल (BMC Commissioner I S Chahal) यांनी संबंधितांना दिले आहेत.

तसेच, मास्क (mask) न घालणाऱ्या नागरिकांवर कडक व दंडात्मक कारवाई करण्यात यावी आणि त्यासाठी आवश्यक क्लिन- अप मार्शलची संख्या वाढविण्यात यावी, असे आदेशसुद्धा आयुक्तांनी दिले आहेत.

२६६ कोविड चाचणी केंद्रे

कोविड बाधा झाल्याची चाचणी लवकरात लवकर होणे हे रुग्णाच्या दृष्टीने तसेच कोविड प्रतिबंधाच्या दृष्टीने आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन महापालिका क्षेत्रात २६६ कोविड चाचणी केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत.

ज्यांना कोविडची लक्षणे असतील, त्यांनी कोविड चाचणी केंद्रात जाऊन कोविड चाचणी करुन घ्यावी. तसेच सील इमारतींमधील व्यक्तिंची देखील टप्प्या-टप्प्याने कोविड चाचणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या अनुषंगाने आपल्या विभागातील कोविड चाचणी केंद्राची माहिती वॉर्ड वॉर रुमद्वारे उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तरी संबंधीत नागरिकांनी आपल्या विभागाच्या वॉर्ड वॉर रुमशी संपर्क साधावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.

महापालिकेच्या सर्व २४ विभागांमध्ये असणा-या सार्वजनिक शौचालयांचे दिवसातून ५ वेळा निर्जंतुकीकरण (सॅनिटायझेशन) करण्याचे निर्देश. तसेच याच पद्धतीने महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये असणा-या शौचालयांचे देखील निर्जंतुकीकरण नियमितपणे करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here