@maharashtracity

उपनिरीक्षकासह चौघे पोलीस जखमी

दोघा आरोपींचे पलायन

धुळे: लूटीच्या गुन्ह्यातील पंजाबमधील (Punjab) दोघा आरोपींना सुरत (Surat) येथून पोलिस वाहनामधून नांदेड (Nanded) येथे घेवून जात असतांना सुरत-नागपूर महामार्गावरील कुसुंबा गावाच्या पुढे दोघांनी अचानक पोलिसांवर हल्ला चढविला. हातकडीसह काठीने मारहाण करत चावा घेत दोघा आरोपींनी पलायन केले.

या हल्ल्यात एका पोलीस अधिकार्‍यासह चौघे पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी दोघांविरुध्द तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या शोधासाठी पथके रवाना झाली आहे.

नवप्रीतसिंग तारेसिंग उर्फ मनदिपसिग सुरजीतसिंग जाट (रा.पो.जस्तरवाल ता. अजनाला जि. अमृतसर, पंजाब) व मोहित उर्फ मनी विजय शर्मा (रा.गल्ली नं. 3. बाटलारोड, प्रीतनगर ता.जि.अमृतसर, पंजाब) अशी दोघा आरोपींची नावे आहेत.

दोघांवर एकाची दुचाकी लुटून नेल्याचा भादंवि कलम 392, 34 प्रमाणे नांदेड येथील विमानतळ पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्यातील दुचाकीसह (एम.एच.26 बी.यू.9556) वरील दोघे आरोपी गुजरात राज्यातील व्यारा पोलिसांनी पकडले.

याबाबत विमानतळ पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक एकनाथ देवके यांना माहिती मिळाली. त्यावरून त्यांनी नांदेड न्यायालयातून मुख्य न्यायदंडाधिकारी व्यारा, गुजरात या न्यायालयाचे ट्रान्सफर वारंट घेतले. ट्रान्सफर वारंट घेतल्यानंतर नांदेड येथून उपनिरीक्षक देवके यांच्यासह पोना. रत्नसागर मिलींद कदम, पोकाँ नाथराव बाबुराव मुंढे, चालक पोकॉ. साईनाथ विश्‍वनाथ सोनसळे हे शासकीय वाहनाने (क्र.एम.एच.26 आर.0667) दोघा आरोपींना आणण्यासाठी दि.13 डिसेंबर रोजी रवाना झाले.

व्यारा (गुजरात) येथे पोहचल्यानंतर दि.17 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास आरोपी नवप्रीतसिंग तारेशसिंग व मोहित उर्फ मनी विजय शर्मा यांचा ताबा मिळाला. दोघांना ताब्यात घेत पथक शासकीय वाहनाने नांदेडकडे निघाले. दोघांना आरोपीच्या हाताला मिळून एक हातकडी लावली होती.

रात्री साडेआठ ते पावणे नऊ वाजेच्या सुमारास पथक धुळे जिल्ह्यात कुसुंबा गावाच्या पुढे येत असतांना दोन्ही आरोपींनी त्यांच्या हातातील हातकडीने अचानक पोकाँ. मुंढे यांच्या डोक्यावर मारहाण केली. तेव्हा दोघांना उपनिरीक्षक देवके व पोना कदम हे पकडण्यास गेले असता त्यांनी देवके यांच्यावर देखील हल्ला केला.

गाडीतील पोलीस काठी देवके यांच्या डोक्यात मारली. पोना कदम यांच्यावर देखील हल्ला करून काठीने माराहण करून त्यांना चावा घेतला. गाडीत आरोपींनी हल्ला केल्याचे लक्षात येताच चालक पोकॉ. साईनाथ सोनसळे यांनी गाडी थांबवून आरोपींना आवरण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी त्यांच्यावर देखील हल्ला करून त्यांना चावा घेतला.

सर्व पोलिसांशी ताकदीनिशी झटापट झाली आणि हल्ला करतांना आरोपींच्या हातातील हातकडी तुटली. झटापट करतांना गाडीचा दरवाजा उघडून दोघा आरोपींनी गाडीतून बाहेर उडी मारून पलायन केले. दोघे रस्त्याचे कडेला असलेल्या शेतात पळाले.

आरोपींच्या हल्ल्यात चौघे पोलिस कर्मचारी जखमी झाले. तरीही सर्वांनी खाली उतरून आरोपींचा शेतात पाठलाग सुरू केला. परंतु ते अंधारात पसार झाले. ही माहीती मिळताच धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

आरोपींच्या हल्ल्यात उपनिरीक्षक देवके व पोकाँ मुंढे यांना गंभीर दुखापत झाली आहे. अन्य दोघांनाही जखमा झाल्या आहेत. चौघांना तत्काळ जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर देवके यांनी तालुका पोलिसात फिर्याद दिली आहे.

आरोपीपेकी एकाचे अंगात पांढरा शर्ट व काळसर पॅन्ट, एकाचे अंगात निळसर टी शर्ट, काळसर पॅन्ट, असे कपडे होते. दोघांची दाढी वाढवलेली आहे. या प्रकरणी दोघा आरोपीविरुध्द गुन्हा दाखल झाला असून तपास पोलिस निरीक्षक हेमंत पाटील करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here