By उल्का महाजन
@maharastracity
मुंबई: महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र तसेच कोकणाला पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे.सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात हाहाःकार उडाला आहे.
रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्याला तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्याला पुराचा जोरदार फटका बसला आहे. तळिये गावावर तर दरड कोसळून ते संपूर्ण गाव गावक-यांना पोटात घेऊन नाहीसे झाले आहे.
या नैसर्गिक म्हटल्या जाणा-या आपत्तीला मानवाचा अवाजवी हस्तक्षेप नक्कीच कारणीभूत आहे. या हस्तक्षेपासंबंधी बोलणे आवश्यक आहेच पण सध्या महापूरातून माणसांना सावरण्यासाटी कोसळणा-या मदतीच्या महापूरासंबंधी बोलणे देखील गरजेचे आहे.

या महापूराची दृश्ये माध्यमांतून प्रसारित झाल्याबरोबर त्याचा गंभीर परिणाम राज्यातील संवेदनशील नागरिकांवर झाला. आणि मदतीचा ओघ या विभागाकडे सुरू झाला. या सहृदयतेचे , माणसांच्या मनातील संकटग्रस्त बांधवांप्रती असलेल्या करुणेचे मनापासून स्वागत करतानाच त्यातील काही अनागोंदी, व त्रुटींकडे लक्ष वेधणे आवश्यक आहे. म्हणून हे आवाहन करत आहोत.
मदत करणे जेवढे गरजेचे तेवढेच ती मदत योग्य ठिकाणी व योग्य प्रकारे पोचते की नाही हे पहाणे देखील जरूरी आहे. मदत करणारांचा व मदत घेणारांचा आपसातला भाव हा सन्मानजनक असणे पण गरजेचा आहे. हा सन्मान राखला जाताना दिसत नाही.
तसेच आपत्तींची तीव्रता ओसरल्यावर माणसे तत्काळ स्वार्थ साधण्याकडे वळतात हे देखील प्रत्येक आपत्तीत दिसून आले आहे. इतरांपर्यत मदत पोचू नये व आपल्याच घरात साठवणूक व्हावी अशी पाचर देखील मारली जाते. त्याला प्रादेशिक ,जातीय आणि धार्मिक कंगोरे देखील असतात.
उदा. महाड तालुक्यात आदिवासी वाड्या, बौद्धवाड्या येथे मदत पोचू दिली जात नाही, मुख्य गावातील वस्तीमधेच गाड्या अडवल्या जातात असा प्रत्यक्ष अनुभव कार्यकर्त्यांना येत आहे. उत्तरप्रदेश ,बिहार मधून आलेल्या मजूरांना बाहेरचे म्हणून मदत दिली जात नाही.

ख-या गरजूंपर्यंत मदत पोचत नाही, आतल्या गल्लया, मुख्य रस्त्यापासून लांब असणा-या वस्त्यांपर्यंत मदत जातच नाही हे देखील अनुभवास येत आहे. मदत वाटून, फोटो काढून झाले की गाड्या निघून जातात. काही वेळा ती अंगावर भीक दिल्याप्रमाणे फेकून गाड्या निघून जातात असे दृष्य दिसत आहे. तर काही वेळा घेणारे ओढाताण करून वस्तू खेचून घेतात, मारामा-या होतात असेही अनुभव आहेत.
फक्त धान्य किराणा सामान मोठ्या प्रमाणात येत आहे पण अन्य तातडीच्या गरजांसाठी विचारच होत नाही असे देखील दिसते आहे.
हे आपोआप टाळतां येणार नाही. त्यासाठी काही जागरूक आणि जाणते प्रयत्न करावे लागतील .या प्रयत्नांना शासनाने व समाजाने देखील मदत करावी
त्यासाठी हे नम्र आवाहन.
शहरात , गावात सक्रिय व जाणत्या नागरिकाचे विभागवार गट/ समित्या बनवण्यात याव्यात. त्यांनी तरूण स्वयंयेवकांच्या मदतीने आळी/गल्लीतल्या कुटुंबांना कोणाला काय प्रकारची मदत आवश्यक आहे त्याची यादी तयार करावी.
अशा याद्या नगरपालिका/ ग्रामपंचायती मार्फत प्रसारित करण्यात याव्यात. मदत देणा-या व घेणा-या साठी हेल्पलाईन सारखा एक किंवा काही नंबर निश्चित करण्यात यावेत. ज्याद्वारे काय मदत हवी आहे हे सांगण्यात येईल.
येणारी मदत त्या त्या गटांनी ठिकाण निश्चित करून उतरवून घ्यावी व गरजेनुसार संबंधित कुटुंबांना वाटण्यात यावी. सर्वांना समान न्याय मिळावा व वाटप सन्मानाने तसेच गरजेप्रमाणे व्हावे.

महाड शहरात घरांची साफसफाई करण्यासाठी देखील विविध संघटनाचे कार्यकर्ते मदत करत आहेत. त्यात देखील सुसुत्रता आणण्याची गरज आहे.
या सर्व कामात राज्य सरकार व शासन यंत्रणा यांनी पुढाकार घेऊन आमच्या सारख्या संस्थांना सर्व प्रकारची मदत मिळेल या साठी हस्तक्षेप करावा असे प्रयत्न स्थानिक पातळीवर करत आहोत.
आम्हाला पाठबळ देणाऱ्या व्यक्ति व संघटना यांनी या बाबत सरकार , लोकप्रतिनिधी व शासन यंत्रणा यांना त्या रितीने कार्यरत करण्यासाठी देखील प्रयत्न करावेत असे आवाहन आम्ही करत आहोत .
असे नियोजित काम करण्याचा आम्ही मर्यादित स्वरुपात प्रयत्न करत आहोत. तरी कृपया ज्यांना मदत करायची असेल त्यांनी या उपक्रमाला साथ द्यावी . यासाठी खालील नंबर संपर्कासाठी देत आहोत.
उल्का महाजन 9869232478
संदेश कुलकर्णी 9272413046
उल्का महाजन, संदेश कुलकर्णी, राजेश कुलकर्णी, प्रभाकर नाईक, चंद्रकांत गायकवाड, सोपान सुतार
पहिल्या दिवसापासून दररोज महाडमध्ये जाऊन केलेले/सुरू असलेले मदतकार्य-
- पूरग्रस्त लोकांना महाडमधून सुरक्षित स्थळी हलविणे.
- त्यांची निवास व भोजन व्यवस्था
- पिण्यासाठी पाणी पुरविणे
- प्रथमोपचार
- जीवनावश्यक गोष्टी पुरविणे
- स्वच्छतेसाठी गरजेच्या गोष्टी पुरविणे
- सानेगुरूजी राष्ट्रीय स्मारक, अविष्कार नर्सरी व आकार पाॅट आर्ट येथे संपर्क यंत्रणा
- जनरेटर व प्रेशर वाॅशर्सची सोय उपलब्ध करून देणे
- हँड ग्लोव्हज् व गमबूट पुरविणे
- पूरात संपूर्णपणे भिजलेल्या घरातील सामान बाहेर काढणे
- घर व परिसरातील चिखल-गाळ व कचरा साफ करणे
- सार्वजनिक परिसराची साफसफाई
- आपत्तीग्रस्तांच्या वैयक्तिक गरजेच्या गोष्टींची पूर्तता
- रेशन व इतर जीवनावश्यक वस्तूंची खरेदी व वाटप
- कपडे, भांडी व इतर गोष्टींचे वाटप
- कुटुंबातील मुली व महिलांना संपर्क करून गरजेच्या गोष्टी पुरविणे
- वाहने हलविणे, दुरूस्ती साठी पाठविणे
- पाण्याच्या मोटारींची दुरूस्ती
- कार्यकर्त्यांच्ये जेवण, पाणी, औषधांची व्यवस्था
- कार्यकर्त्यांच्या सुरक्षिततेसाठी सूचना व उपाययोजना
- कार्यकर्त्यांना महाडला जाण्यासाठी वाहनांची सोय व त्यासाठी होणारा खर्च
- घरातील वायरिंगची साफसफाई व त्यासाठी मदत करण्यासाठी आलेल्या तंत्रज्ञांचे नियोजन
- महावितरण यंत्रणेबरोबर संवाद व समन्वय
- श्री विरेश्र्वर देवस्थान ट्रस्ट सभागृहात संपर्क, समन्वय व मदत केंद्र चालविण्यासाठी अस्थायी कार्यालय सुरू करणे
- शासकीय यंत्रणेकडून आवश्यक तपशील मिळविणे
- महाड शहराजवळील गाव- वाडी- वस्त्यांची पहाणी
- पूरग्रस्तांच्या कुटुंबाची गरज लक्षात घेऊन त्याची नोंद करणे
- पूर परिस्थितीचे डाॅक्युमेंटेशन
- पर्यावरणीय दृष्टिकोनातून तपशील जमविणे
- विविध संस्था, संघटना, अस्थापनांकडून आलेली मदत जमा करणे वाटप करणे/करण्यासाठी मदत करणे
- पुनर्वसन व त्यासंबंधी धोरणांचा अभ्यास व सूचनांसाठी माहिती जमा करणे
- संपूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या घरांच्या पुनर्रचनेच्या डिझाईन व मटेरियल विषयी मार्गदर्शन
सर्वहारा जन आंदोलन
आरोग्य सेना
राष्ट्र सेवा दल
अंधश्रद्धा निर्मुलन समिती महाराष्ट्र
साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक
आकार पाॅट आर्ट
आविष्कार नर्सरी
जनआंदोलनांचीसंघर्ष समिती, महाराष्ट्र