@maharashtracity

मुंबई: आयकर विभागाने स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या घरी टाकलेल्या धाडीनंतर पालिका आयुक्त इकबाल चहल (BMC Commissioner IS Chahal) यांना आयकर विभागाकडून नोटीस आल्याची जोरदार चर्चा पालिका वर्तुळात होती. मात्र, आपल्याला कोणत्याही प्रकारची नोटीस आयकर विभागाकडून (Income Tax Department) देण्यात आलेली नाही, असे स्पष्टीकरण पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी दिले आहे.

यशवंत जाधव यांच्या घरी २५ फेब्रुवारी रोजी आयकर विभागाने धाड (IT raid) टाकली होती. या धाडीत मोठे घबाड सापडले असून या प्रकरणात पालिकेतील ३ अधिकारी व शिवसेनेचे (Shiv Sena) ३ नेते यांची नावे समोर आल्याचे बोलले जाते.

आपल्याला आयकर विभागाची कोणतेही नोटीस आलेली नाही, असे स्पष्ट करतांनाच, याप्रकरणी आपल्या नावाची उगाच अफवा पसरवणाऱ्यांविरोधात पोलिसांत तक्रार करणार असल्याचे आयुक्तांनी म्हटले आहे.

यशवंत जाधव यांच्या घरावरील धाडीनंतर राजकीय घडामोडिंबाबत पालिका वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. जाधव यांच्या घरात तब्बल चार दिवस आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुक्काम ठोकला होता. या कारवाईतून आयकर विभागाला २ कोटींची रोख रक्कम, दीड कोटींचे दागिने, ३६ ठिकाणी कोट्यवधी रुपयांची मालमत्ता मिळाल्याचे समोर आले आहे. त्यातच या प्रकरणात पालिकेचे ३ अधिकारी, कंत्राटदार , शिवसेना नेते यांची नावे असल्याची चर्चा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here