@maharashtracity
मुंबई: कोरोनाच्या पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेत कोविड समर्पित सेव्हन हिल रुग्णालयात (Seven Hills Hospital) रुग्ण दाखल होण्याचे रेकॉर्ड केले, अशा या रुग्णालयात गुरुवार पर्यंत २४ तासात एकही कोरोनाचा नवीन रुग्ण दाखल झाला नसल्याचे रुग्णालय अधिष्ठाता डॉ. बाळकृष्ण अडसूळ यांनी सांगितले. कोरोना काळातील हा ऐतिहासिक क्षण असून पालिका रुग्णालयात एकही कोरोना रुग्ण (corona patient) दाखल तसेच कोरोना मृत्यू झाला नसल्याचे डॉ. अडसूळ म्हणाले.
सेव्हन हिल्स रुग्णालय हे १ एप्रिल २०२० पासून कोविड रुग्णसेवेसाठी समर्पित करण्यात आले. या ठिकाणी आतापर्यंत ४७ हजार ८० रुग्ण कोरोना उपचारासाठी दाखल झाले. तर आतापर्यंत ४२ हजार १३८ रुग्णांना यशस्वी उपचार करून घरी सोडण्यात आले. या ठिकाणी ३ हजार २७९ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाले असून सध्या १५ रुग्ण आयसीयूत (ICU) उपचार घेत असल्याचे सांगण्यात आले.
तर ३ लाख ७३ हजार २९८ लाभार्थ्यांना लस देण्यात आले असल्याचे डॉ. बाळकृष्ण अडसूळ म्हणाले. कोरोनाच्या तिन्ही लाटेत सेव्हन हिल्स रुग्णालयात रुग्णांना दाखल करण्यासाठी रोज शेकडो फोन येत. यात गंभीर रुग्णांची संख्या अधिक असे. मात्र कित्येकांना उपचारांती कोरोना मुक्त करण्यात आले.
यावर बोलताना पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले कि, अद्याप हि सेव्हन हिल्स रुग्णालयात कोविड उपचार होत आहेत. इतर पालिका रुग्णालये कोरोनेतर रुग्ण सेवा करत आहेत. मात्र सेव्हन हिलमध्ये सहव्याधी असलेले पण कोविड पॉझीटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्याचसोबत नॉन कोविड आजारांवर उपचार केले जात असल्याचे काकाणी म्हणाले.