@maharashtracity

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सुचनांची अंमलबजावणी

समुद्र, नद्या, तलावातील प्रदूषण रोखणार

२०२२ च्या गणेशोत्सवापूर्वी अंमलबजावणी

पीओपी मूर्तीवर बंदी, शाडू माती, पर्यावरणपूरक मूर्ती, सजावट बंधनकारक

पर्यावरणपूरक मूर्ती नसल्याचे आढळले तर डिपॉझिट जप्त , २ वर्षांसाठी नोंदणी रद्द

मुंबई: देशभरात गणेशोत्सव, नवरात्रौत्सव, ताजिया आदी सण, उत्सव व इतर कार्यक्रम साजरे करताना समुद्र, नद्या, तलाव व नैसर्गिक स्रोत या ठिकाणी होणारे प्रदूषण रोखण्यासाठी व पर्यावरणपूरक सण, उत्सव साजरे करण्याच्या उद्देशाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे सुधारित मार्गदर्शक सूचनांची सन २०२२ पासून स्थानिक स्वराज्य संस्था, अन्य प्राधिकरणाच्या माध्यमातून कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. (Strict rules for festivals to avoid water pollution)

या नियमावलीमुळे समुद्र, नद्या, तलावातील प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच, या कडक नियमांमुळे आगामी गणेशोत्सव, नवरात्रौत्सवात मूर्तिकारांना पीओपीची गणेशमूर्ती, देवीची मूर्ती निर्माण करणे, त्याची विक्री करणे यावर बंदी घालण्यात आली आहे. (No POP idol will be allowed)

मूर्तीकारांना, पीओपी ऐवजी शाडू माती, पर्यावरणपूरक मूर्ती करण्याचे पर्याय उपलब्ध करण्यात आले आहेत. तसेच, सण, उत्सवाप्रसंगी सजावट ही पर्यावरणपूरक असणे बंधनकारक करण्यात आले आहे.

याचा मोठा आर्थिक फटका मूर्तिकारांना बसणार आहे. तसेच, लालबागचा राजा, गणेशगल्ली अन्य प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळात पीओपी च्या मोठमोठ्या मूर्ती बसविणे कठीण होणार असल्याने नाईलाजाने कोरोना कालावधीत ज्याप्रमाणे चार फुटांच्या गणेशमूर्ती बसविण्यात आल्या त्याप्रमाणेच यापुढेही त्याची अंमलबजावणी करणे भाग पडणार असल्याचे दिसते.

… तर मुर्तीकाराचे डिपॉझिट जप्त, २ वर्षांसाठी नोंदणी रद्द होणार

उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सुचनांनुसार, गणेशोत्सव, नवरात्रौत्सव यासह सर्वच सण-उत्सवांमध्ये जास्तीत-जास्त पर्यावरणपूरकता जपणे गरजेची असल्याची भूमिका केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने मांडली आहे.

यासंबंधित सुधारित मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यांची अंमलबजावणी अगोदर काही प्रमाणात केली जात होती. मात्र, आता या नियमांची अंमलबजावणी कडकपणे करण्यात येणार आहे.

त्यानुसार, गणेशोत्सव, नवरात्रौत्सव प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर करून मूर्ती तयार करण्यास व त्याची विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

या नियमांचे उल्लंघन करून मुर्तीकारांनी पीओपीच्या मूर्ती बनवून त्यांची विक्री केल्याचे आढळून आल्यास संबंधित मूर्तिकाराचे डिपॉझिट जप्त करून त्याची पालिकेकडे करण्यात आलेली नोंदणी २ वर्षांसाठी रद्द करण्यात येणार आहे.

पालिका, मूर्तिकारांची बैठक

गणेशोत्सव, नवरात्रौत्सव, ताजिया आदी सण-उत्सव अधिक पर्यावरणपूरक पद्धतीने करण्याबाबत व मूर्ती विसर्जनाबाबत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे जारी करण्यात आलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचना, नियमांची सखोल माहिती देण्यासाठी पालिकेचे वरिष्ठ अधिकारी व गणेश मूर्तिकार यांची महत्वपूर्ण समन्वय बैठक शुक्रवारी पार पडली.

या बैठकित प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांबाबत सखोल माहिती सादर करण्यात आली.

पालिका अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्या निर्देशांनुसार आयोजित पहिल्या समन्वय बैठकीत उप आयुक्त (परिमंडळ – २) तथा गणेशोत्सव समन्वयक हर्षद काळे यांच्यासह ‘एस’ विभागाचे सहायक आयुक्त अजितकुमार आंबी हे उपस्थित होते.

तसेच, महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जयंत हजारे, मुंबई पोलीस दलाचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुरेश पाटील, ‘नीरी’ या संस्थेचे प्रतिनिधी डॉ. नितीन गोयल, पालिका विकास नियोजन खात्याचे कार्यकारी अभियंता श्री. कामत यांच्यासह बृहन्मुंबई सार्वजनिक गणशोत्सव समन्वय समिती, मुंबई उपनगरे श्री गणेशोत्सव समन्वय समिती, अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ, बृहन्मुंबई मूर्तिकार संघ इत्यादी संस्थांचे – संघटनांचे प्रतिनिधी देखील या बैठकीला उपस्थित होते.

या अनुषंगाने मूर्तिकार संघटनेच्या सदस्यांनी पर्यावरणपूरक शाडूच्या मातीची मूर्ती तयार करण्यास अधिक कालावधी लागतो व जागा देखील अधिक लागते, असे नमूद करीत महापालिकेने भविष्यात मुर्तिकारांना मंडप परवानगी देताना ती अधिक जागेसाठी व अधिक कालावधीसाठी द्यावी, असे मत मांडले.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सुधारित मार्गदर्शक सुचना

१) मूर्ती केवळ नैसर्गिक, जैविकदृष्ट्या विघटनशील आणि पर्यावरणपूरक साहित्यापासून तयार केलेल्या असाव्यात.

२) सजावट करताना ती पाना-फुलांची असावी.

३) सिंगल युज प्लास्टिक’ हे पूर्णपणे प्रतिबंधीत.

४) मूर्ती रंगविताना तसेच सजावटीसाठी वापरण्यात येणारे रंग हे पर्यावरणपूरक.

५) स्थानिक स्वराज्य संस्थांकडे मुर्तिकारांची नोंदणी असणे, मुर्तिकारांनी पर्यावरणपूरक मूर्ती बनविणे आवश्यक.

६) मूर्ती पर्यावरणपूरक नसल्याचे आढळून आल्यास डिपॉझिट जप्त करण्यासह २ वर्षांसाठी नोंदणी रद्द.

७) पूजेदरम्यान फुले, पत्री, वस्त्र इत्यादींचा सजावटीसाठी वापर करण्याच्या सूचना.

८) पत्रावळींचा वापर करण्याच्या सूचना.

९) विसर्जनादरम्यान पर्यावरणपूरकता जपण्याच्या अनुषंगाने नदी, तलाव, समुद्र इत्यादींमध्ये मूर्ती विसर्जन करण्याबाबत स्वतंत्र सूचना.

१०) समुद्रात मूर्ती विसर्जन करताना संबंधीत सागरी किनारा व्यवस्थापन प्राधिकरणांद्वारे निर्धारित करण्यात आलेल्या जागी आणि ओहोटी रेषा व भरती रेषा यामध्ये विसर्जन करण्यास अनुमती.

११) घरगुती स्तरावरील मूर्ती विसर्जन हे घरच्या-घरी करण्यास प्राधान्य.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here