@maharashtracity

२ राष्ट्रीय स्तरावरील सर्वेक्षणांमध्ये दखल

मुंबई: आऊटलुक साप्ताहिकाने देशभरातील सार्वजनिक क्षेत्रातील दंत महाविद्यालयांमध्‍ये तिसरे स्थान देत महापालिकेच्या नायर दंत महाविद्यालयाचा (Nair Dentist college) गुणगौरव केला आहे. तर द वीक या नियतकालिकाने देशभरातील सर्वोत्कृष्ट दंत महाविद्यालयांमध्ये नायर दंत महाविद्यालयाला पाचवे स्थान दिले आहे. एकाचवेळी राष्ट्रीय स्तरावरील २ वेगवेगळ्या सर्वेक्षणांमध्ये अग्रेसर ठरल्याने नायर दंत महाविद्यालयाच्या शैक्षणिक कामगिरीसह तेथील सुविधांचा देखील राष्ट्रीय स्तरावर गौरव झाला आहे.

महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल (BMC Commissioner I S Chahal) व अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी नायर दंत महाविद्यालयाच्या सर्व टीमचे अभिनंदन केले आहे.

नायर दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ.नीलम अंद्राडे यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, मार्च २०२० पासून उद्भवलेल्या कोविड काळात नायर दंत महाविद्यालय आणि दंत रुग्णालय अव्याहतपणे कार्यरत आहे. कोविडसारख्या साथरोगाच्या परिस्थितीत दंत वैद्यकीय सेवा देताना साथरोगाचा संसर्ग होऊ नये, या दृष्टीने काळजी घेतली जात आहे.

देशातील सर्वात जुन्या दंत महाविद्यालयांमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे रुग्णालय असा लौकिक पालिकेच्या नायर दंत महाविद्यालयाचा आहे. दर्जेदार उपचार, वैद्यकीय सेवा, शैक्षणिक व सोयी-सुविधा विषयक कामगिरीची दखल दोन राष्ट्रीय स्तरावरील सर्वेक्षणांमध्ये घेण्यात आली आहे.

२४ तास ‘इमर्जन्सी डेंन्टल क्लिनिक’ संचलित करणारे देशातील हे एकमेव दंत महाविद्यालय व रुग्णालय असल्याची माहिती डॉ. अंद्राडे यांनी दिली आहे.

दरम्यान, खासगी क्षेत्रातील दंत महाविद्यालयांच्या शैक्षणिक कामगिरीसह विविध स्तरीय मूल्यमापन करुन त्यातून सर्वोत्कृष्ट दंत महाविद्यालयांची निवड करण्यासाठी यंदाच्या वर्षी २ वेगवेगळी सर्वेक्षणे करण्यात आली. त्यामध्ये नायर दंत महाविद्यालयाचा गुणगौरव करण्यात आला आहे.

राष्ट्रीय स्तरावर करण्यात आलेली ही सर्वेक्षणे २ नामांकित नियतकालिकांच्या पुढाकाराने करण्यात आली. या सर्वेक्षणासाठी देशातील दंत महाविद्यालयांची सर्वंकष माहिती, बहुस्तरीय कामगिरी, उपलब्ध पायाभूत सुविधा, शैक्षणिक सुविधा आणि त्यांची गुणवत्ता, शिक्षणातील वैविध्य, संस्थेकडून आयोजित केले जाणारे उपक्रम, संशोधन, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रकाशित प्रबंध व निबंध, शिक्षण पूर्ण करुन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या व्यवसायिक संधी अशा वेगवेगळ्या निकषांचा विचार करुन हे मूल्यांकन करण्यात आले.

तर ‘द वीक’ (The Week) या साप्ताहिकाच्या पुढाकाराने देशपातळीवरील सार्वजनिक व खासगी क्षेत्र मिळून विविध दंत वैद्यकीय महाविद्यालयांच्या कामगिरीचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात नायर दंत वैद्यकीय महाविद्यालयाला देशभरात ५ वा क्रमांक बहाल करण्यात आला आहे.

आऊटलुकच्या (Outlook) पुढाकाराने देशभरातील सार्वजनिक आणि खासगी अशा निवडक दंत वैद्यकीय महाविद्यालयांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यात आले. या सर्वेक्षणात महानगरपालिकेच्या नायर दंत वैद्यकीय महाविद्यालयाने शासकीय महाविद्यालय गटामध्‍ये तिसरे स्थान पटकाविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here