@maharashtracity

राज्यात पुन्हा जमावबंदी, नाईट कर्फ्यू

टास्क फोर्सच्या बैठकीत मुख्यमंत्र्याचा निर्णय

मुंबई: मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यानी टास्क फोर्सच्या सदस्यांसह राज्यातील प्रमुख अधिकाऱ्यांची गुरुवारी रात्री तातडीची बैठक घेवून चर्चा केली. ओमिक्रॉनची वाढणारी रुग्णसंख्या पाहता राज्यात पुन्हा नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.

कोविड आणि ओमीक्रॉन आजाराला घेऊन राज्यात गंभीर स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने केंद्र सरकारने पंचसूत्री निर्बंध लागू करण्याबाबत सर्व राज्यांना सूचना दिल्या आहेत.

दरम्यान, शुक्रवारी राज्य आरोग्य विभागाने सांगितल्याप्रमाणे राज्यात १४१० नवीन कोविड रुग्णांचे निदान झाल्याचे सांगण्यात आले. तर ओमीक्रॉन संसर्गाचे २० रुग्ण नोंदविण्यात आले. यातील १४ रुग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने तर ६ रुग्ण भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था, पुणे यांनी नोंद केले आहेत.

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्यात कोविड रुग्ण संख्या नियंत्रणासाठी होणारी वाढ लक्षात घेता संसर्ग रोखण्यासाठी कशाप्रकारे निर्बंध लावता येतील यावर टास्क फोर्स सदस्यांच्या
बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले.

आगामी नाताळ, नववर्ष स्वागत असे प्रसंग लक्षात घेऊन कमीतकमी गर्दी कशी होईल तसेच विवाह समारंभ, पार्ट्या या अनुषंगाने हॉटेल्स आणि उपहारगृहात होणाऱ्या गर्दीवर कसे निर्बंध लावता येतील यादृष्टीने विस्तृत चर्चा करण्यात येऊन याबाबत नवी नियमावली जाहीर करण्याचे ठरले.

..तर राज्यभरात रात्रीची जमावबंदी लागू

या चर्चेनुसार राज्यभरात रात्रीची जमावबंदी लागू होणार असून पाचपेक्षा जास्त व्यक्तीना एकत्र येण्यास मज्जाव केला जात आहे. ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्यात हॉटेल रिसॉर्ट तसेच चौपाट्या या ठिकाणी रात्रीची जमावबंदी असल्याने फटाके फोडता येणार नाहीत, आतषबाजी करता येणार नाही.

लग्नसमारंभ कार्यक्रम यांवरही निर्बंध घालण्यात आले आहेत. १०० जणांनाच परवानगी देण्यात आली. या आधी ही मर्यादा २०० जणांना होती. या शिवाय बंदिस्त जागेतील कार्यक्रम समारंभ, लग्न, इतर कार्यक्रम यांसाठी शंभर लोकांनाच परवानगी २५% किंवा १०० यामध्ये जी कमी ती मर्यादा लागु करण्यात येत आहे.

खुल्या जागेत ५०% किंवा १०० यामध्ये जी कमी ती मर्यादा लागू. शंभर लोकांनाच परवानगी, रेस्टरंट- ५०% क्षमतेने सुरु राहतील. त्याकरीता प्रशासनाचे हॉटेल, रेस्टॉरंटकडे बारकाईने
लक्ष राहणार असल्याचे सांगण्यात आले.

युरोप, अमेरिकेत कोरोनाची वाढती संख्या

आज झालेल्या बैठकीत इतर राज्यांनी लावलेल्या निर्बंधांवर तसेच युरोप, अमेरिकेत कोरोनाची वाढत्या संख्येवर चर्चा करण्यात आली. मुख्य सचिव देवशीष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार डॉ दीपक म्हैसेकर, पालिका आयुक्त इकबालसिंह चहल, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय, टास्क फोर्सचे डॉ संजय ओक, डॉ शशांक जोशी, डॉ अजित देसाई, डॉ राहुल पंडित आदींनी सहभाग घेतला व सूचना केल्या होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here