संतप्त आरोग्य सेविकांचे पोलिस ठाण्यात आंदोलन

Twitter: @maharashtracity

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या एम वॉर्डमधील आरोग्य सेविका रेखा खराटमोल, अयोध्या नगर या आरोग्य केंद्रात कामावर आल्यानंतर २३ जानेवारी २०२३ पासून गायब असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रेखा यांचा शोध घेण्यासाठी महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अॅड. प्रकाश देवीदास हे पालिका आयुक्त आणि पोलिसांकडे धावाधाव करत आहेत. मात्र अद्याप या आरोग्य सेंविकेचा तपास लागला नाही.

दरम्यान, रेखा खराटमोल या अयोध्या नगरातील आरोग्य केंद्रात येऊन फिल्डवर निघून गेल्या. मात्र दुपारच्या दरम्यान अहवाल सादर करण्यासाठी त्या आरोग्य केंद्रात परतल्या नाहीत. ही घटना समजल्या वर अॅड. प्रकाश देवीदास यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त आरोग्य सेवा तसेच कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांच्याशी संपर्क साधला.

रेखा खराटमोल यांना शोधण्यासाठी प्रयत्न जोरात सुर असून चार दिवसापूर्वी बेपत्ता असलेल्या आरोग्य सेविकेला पोलिस शोधू शकत नाही ही पटण्यासारखी गोष्ट नसल्याचे आरोग्य संघटना सांगत आहेत. तसेच रेखा यांच्याकडे मोबाईल होता. त्यांनी कुठे भेटी दिल्या हे कळू शकते. आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनीही पोलिसांना खोटी माहिती दिली. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलेले नाही असा आरोप करत गोवंडी पोलिस स्टेशनवर एमईस्ट व एमवेस्ट वार्डच्या आरोग्य सेविकांनी आंदोलन केले.

रेखा खरटमोल यांचा शोध त्वरीत घ्यावा, अन्यथा ठिय्या आंदोलन सुरु करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला असल्याचे महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या सरचिटणीस अॅड. विदुला पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, अधिकच्या माहिती नुसार रेखा यांचा फोन दादर पूर्वेला अॅक्टिव्ह असल्याचे आढळून आले. मात्र त्या दादर परिसरात का आल्या असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. किंवा त्यांचा फोन कोणी चोरट्याने चोरुन त्या परिसरात फेकला अशी शक्यता वर्तविण्यात येत आहेत. दरम्यान या प्रश्नांची उत्तरे रेखा यांच्या भेटीनंतरच समोर येणार असल्याचा अंदाज करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here