@maharashtracity

मुंबई: मुंबईत कोविड-१९ प्रतिबंधक राष्ट्रीय लसीकरण मोहीमेच्या अंतर्गत कोरोनावरील लसीची (corona vaccine) पहिली आणि दुसरी मात्रा मिळून एकूण दीड कोटी मात्रा देण्याची उत्कृष्ट कामगिरी मुंबई महापालिकेच्या (BMC) माध्यमातून १० नोव्हेंबरपर्यंत पार पाडण्यात आली आहे. (More than one and a half crore covid dose administered by BMC)

मुंबईमधील (Mumbai) सर्व शासकीय, पालिका व खासगी लसीकरण केंद्रांवर दीड कोटी लसीची मात्रा देण्यात आली आहे.

मुंबईत गेल्या मार्च २०२० पासून कोविडचा (covid) प्रादुर्भाव सुरू झाला होता. कोविडला रोखण्यासाठी केंद्र, राज्य शासन व मुंबई महापालिका यांच्याकडे कोणतेही औषध उपलब्ध नव्हते व आजही नाही. मात्र, कोविड प्रतिबंधक लस विदेशात व देशात तयार करण्यात आल्यानंतर मुंबईसह देशभरात १६ जानेवारी २०२१ पासून कोविड-१९ प्रतिबंधक राष्ट्रीय लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली.

कोविडला रोखण्यासाठी, त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी टप्प्या-टप्प्याने या लसीकरण मोहिमेची व्याप्ती वाढविण्यात आली.

सर्वप्रथम आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी (Health workers) लसीकरण सुरु झाले. त्यानंतर आघाडीवरील (फ्रंटलाईन) (front line workers) कर्मचाऱ्यांसाठी दिनांक ५ फेब्रुवारी २०२१ रोजी ६० वर्ष वयावरील तसेच ४५ ते ५९ वयोगटातील सहव्याधी असलेल्या नागरिकांसाठी १ मार्च २०२१ रोजी, तसेच, ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी १ एप्रिल २०२१ रोजी, १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी १ मे २०२१ पासून लसीकरण मोहीम राबविण्यात आली.

पालिका आयुक्त इकबाल चहल (BMC Commissioner I S Chahal) यांच्या आदेशाने व अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी (Suresh Kakani) यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग लसीकरणासाठी विविध उपक्रम राबवित आहे.

त्याचाच एक भाग म्हणून विविध समाज घटकांसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करुन विशेष लसीकरण सुरु करण्यात आले. लसीकरण केंद्रांवर जास्त वेळ रांगेत उभे रहावे लागू नये म्हणून ४ मे २०२१ पासून ज्येष्ठ नागरिकांसाठी (senior citizen) ड्राईव्ह-इन लसीकरण सुरु करण्यात आले.

तसेच, स्तनदा मातांसाठी २६ मे २०२१ पासून तर विदेशात शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी अथवा नोकरी / व्यवसायासाठी जाणाऱ्यासाठी दिनांक १ जून २०२१ पासून लसीकरण राबविण्यात येत आहे.

शारीरिक व मानसिकरित्या दुर्बल व्यक्तिंसाठी २३ जून २०२१, गर्भवती स्त्रियांसाठी आणि शासकीय ओळखपत्र नसलेल्या नागरिकांसाठी १४ जुलै २०२१ पासून लसीकरण हाती घेण्यात आले. तर, वैद्यकीय कारणांनी व वयोमानाने अंथरुणास खिळून असलेल्या नागरिकांच्या घरी जाऊन २ ऑगस्ट २०२१ पासून लसीकरण राबविण्यात येत आहे.

तसेच, दिव्यांग व्यक्ती, आदिवासी बांधव, कारागृहांमधील बंदिवान, एलजीबीटी (LGBT) समुदायातील नागरिक इत्यादींसाठी विशेष केंद्र, फक्त महिलांसाठी राखीव विशेष लसीकरण सत्र, शिक्षक आणि १८ वर्ष वयावरील विद्यार्थी यांच्यासाठी राखीव सत्र, फक्त दुसरा डोस देय असणाऱ्या नागरिकांसाठी राखीव सत्र अशा निरनिराळ्या उपाययोजना महानगरपालिकेने केल्या आहेत.

त्याचा परिणाम म्हणून सर्व समाज घटकांपर्यंत पोहोचून सर्वाधिक वेगाने लसीकरण करण्यात मुंबई आघाडीवर आहे. समाजातील कोणताही घटक लसीकरणातून वंचित राहणार नाही, याची पुरेपूर दक्षता प्रशासन घेत आहे.

लसीकरणाची व्याप्ती व वेग वाढवल्यानंतर महापालिकेने सातत्याने विक्रमी कामगिरी नोंदवली आहे. १६ जानेवारी २०२१ रोजी लसीकरण सुरु केल्यानंतर ५ मे २०२१ रोजीपर्यंत २५ लाख मात्रा देण्याचा टप्पा गाठण्यात आला.

त्यानंतर २६ जून २०२१ रोजी ५० लाख, ७ ऑगस्ट २०२१ रोजी ७५ लाख, ४ सप्टेंबर २०२१ रोजी १ कोटी, २८ सप्टेंबर २०२१ रोजी १ कोटी २५ लाख आणि आता १० नोव्हेंबर २०२१ रोजी १ कोटी ५० लाख लसीच्या मात्रा देण्याचा टप्पा गाठण्यात आला आहे.

आज सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंतच्या लसीकरणाचा विचार करता पहिली व दोन्ही मात्रा मिळून १ कोटी ५० लाख ६७ हजार ८८३ मात्रा देण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here