By विजय साखळकर

@maharashtracity

दिनांक ११ जानेवारी १९८२ रोजी मन्या सुर्वे (Manya Surve) आपल्या प्रेयसीला वडाळा डेपोजवळ भेटायला येणार असल्याची खबर मिळाल्यापासून मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) पथकानं वडाळा डेपोसमोर फिल्डिंग लावली हो‌ती. मन्याच्या प्रेयसीचे नाव किंवा ती कशी दिसते, यासंबधात कोणतीच माहिती पोलिसांपाशी नव्हती. त्यामुळे सर्वात महत्त्वाचे काम पोलिसांसमोर होते ते या प्रेयसीची ओळख पटविणे. त्यामुळे पोलिसांच्या नजरा स्वाभाविकपणे वडाळा डेपोबाहेर (Wadala Depot) असणाऱ्या बस स्टाॅपजवळ आणि आजूबाजूला वावरणाऱ्या महिला प्रवाशांवर खिळल्या होत्या. संशयास्पद व्यक्तीं निरखणे सुरू होते.

वडाळा डेपोसमोरचा भाग आजच्याएवढा गजबजलेला नव्हता. त्यामुळे मन्याची प्रेयसी हुडकून काढणं त्यांना अवघड नव्हते. वडाळा डेपोमधून सुटणाऱ्या बसेस बाहेर येऊन प्रवाशांनी भरल्या जात आणि समोरच्या फुटपाथवर असणाऱ्या बस स्टाॅपवर थांबणाऱ्या बसेसमधून उतरणाऱ्या महिला प्रवाशांवर नजर ठेवून संशयित कुणी आढळते का, याची छाननी सुरू होती.

वडाळा डेपोच्या समोर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर काॅलेज (Dr Babasaheb Ambedkar College), त्याच्यापुढे सिध्दार्थ विहार हाॅस्टेल असा परिसर होता. दुपारी तीन वाजेपासून एक तरुणी बस स्टाॅपवर उभी असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. कितीतरी बसेस गेल्या तरी ती तिथे उभी होती. त्यामुळे बहुधा हीच ती मन्याची प्रेयसी असावी असा अंदाज पोलिसांनी काढला होता. मात्र, तिला फिचरमध्ये आणायचे नाही हे पोलिसांनी ठरवलं होतंं. त्यामुळे तिच्यावर फक्त नजर ठेवली गेली होती. तिला कुणी हटकले नाही. कारण तिला बेसावध ठेवायचे होते.

१९८८ साली प्रकाशित झालेल्या ‘गहजब’ या दिवाळी अंकात मन्या सुर्वेच्या चकमकीचा थरार प्रकाशित झाला होता. त्यात समग्र पोलीस टीममधील सदस्याची नावंही दिली गेली होती. या ऑपरेशनसाठी नवे रंगरूट निवडण्यात आले होते. म्हणजे पोलीस दलात अगदी नव्यानं दाखल झालेले उपनिरिक्षक निवडण्यात आले होते. ते तरुण होते. साधारण २५ वयाच्या दरम्यानचे होते. पोलीस दलातील वाटू नयेत म्हणून त्यांना काॅलेजकुमारांसारखा पोषाख परिधान करण्यास सांगण्यात आले होते. वडाळा डेपोसमोर असणाऱ्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर काॅलेजचे ते विद्यार्थी असावेत, असा पाहणाऱ्यांचा समज व्हावा, यासाठी त्यांना असा हुलिया दिला गेला होता.

सर्व मंडळींची एकंदर वर्तणूक काॅलेज कुमारांसारखी होती. त्यापैकी काहीजण काॅलेजच्या बाहेर उभ्या असणाऱ्या मोटारींवर, मोटरींच्या टपावर हसत खिदळत होते. काहीजण इतस्तत: भटकत होते. तीन – तीन, चार- चार जणांच्या घोळक्यांने ते वावरत होते. पण त्यांचे कान मात्र एका रनिंग काॅमेंट्रीकडे होते. प्रवेशद्वाराजवळ असलेल्या एका मोटारीच्या आरशातून वडाळा डेपोसमोरच्या हालचालींवर या पथकाला मार्गदर्शन करणाऱ्या अधिकाऱ्यांची बारीक नजर होती आणि जे जे काही दिसत होतं, त्याची रनिंग काॅमेंट्री सुरू होती आणि आपल्याच मस्तीत वावरणाऱ्या नव्या रंगरूटांना या काॅमेंट्रीतून समोर काय घडतेय, याची माहिती मिळत होती.

हे सारं काही आखलं गेले होते ते मन्याला सापळ्यात अचूक पकडण्यासाठी. कारण मन्या हा अतिशय धूर्त होता आणि तो या ठिकाणी नेमक्या कोणत्या दिशेने येणार याची माहिती पोलिसांपाशी नव्हती. त्यामुळे ही युक्ती वापरण्यात आली होती. साधारण साडेचार-पावणेपाचच्या सुमारास एक टॅक्सी आली व त्यातून एक धष्टपुष्ट माणूस उतरला. त्यावेळची रनिंग काॅमेंट्री होती….

तोच आलाय बहुधा, कारण तो अत्यंत शांतपणे समोर आजूबाजूला पाहतोय, नजर फिरवतोय, अंदाज घेत असावा… पोलीस तर नाहीत ना कुठे!

सारे काॅलेजकुमार सावध झाले. आधी ठरल्यानुसार त्यांनी आपापल्या ठरवून दिलेल्या जागेवर जायला सुरूवात केली. तेवढ्यात त्या इसमाला काही तरी जाणीव झाली असावी. त्यामुळे त्याचा हात पॅंटच्या खिशाकडे गेला. त्याला गांगरवून टाकण्यासाठी कुणीतरी मन्या अशी हाक मारली. त्यानं झटकन मागे वळून पाहिलं. त्याक्षणी सर्वांच्या लक्षात आलं की या क्षणी त्यांच्यातला एक अधिकारी संजय परांडे हा मन्याच्या अगदी जवळ आहे. इतका जवळ की मन्याला संशय आला असता तर त्याने परांडेना एकतर ओलीस धरून स्वत:ची सुटका करवून घेतली असती किंवा खिशातून सहाबारी पिस्तुल काढून गोळ्या झाडल्या असत्या. त्यामुळे क्षणाचाही वेळ न दवडता गोळ्या झाडण्यात आल्या. मन्या नावाचं वादळ शमलं.

मुंबई पोलिसांच्या इतिहासात पहिल्या चकमकीची (Encounter) नोंद झाली.

(लेखक विजय साखळकर हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांनी अनेक वर्षे गुन्हेगारी जगताचे वार्तांकन केले आहे.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here