विकास कामांचा दीपक कपूर यांच्याकडून आढावा

विविध कंपन्या, व्यापारी संघटना, अधिकाऱ्यांसोबत बैठकींचे सत्र

@maharashtracity

नागपूर: महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे (MADC) उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर (Deepak Kapoor) यांची सोमवारची मिहान भेट फलदायी ठरली आहे .पतंजली उद्योग समूहाने मिहानमधील आपल्या प्रकल्पात पुढील तीन आठवड्यात प्रत्यक्ष उत्पादनाला सुरुवात करण्याचे आश्वासन कपूर यांना दिले आहे.

दीपक कपूर यांनी सोमवारी मिहान (MIHAN SEZ) येथे दिवसभर घेतलेल्या वेगवेगळ्या बैठकांमध्ये विविध कंपन्या, व्यापारी संघटना व अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. नागपूरसह विदर्भासाठी ग्रोथ इंजिन (Growth Engine of Vidarbha) ठरत असलेल्या मिहान प्रकल्पाला गतिशील करण्यासाठी सर्व प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढा, अडचणी विना तोडगा ठेवू नका, असे निर्देश त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.

कपूर यांनी मिहानमध्ये विविध कंपन्यांच्या सुरू असलेल्या विकासकामांचा दिवसभर आढावा घेतला. यावेळी कपूर यांनी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे अधिकारी, मिहान इंडिया लिमिटेडचे अधिकारी, विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन (Vidarbha Industries Association) आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे (IIM) अधिकारी, विविध शिष्टमंडळासोबत स्वतंत्ररित्या विस्तृत बैठका घेतल्या. मिहान इंडस्ट्रीज असोसिएशन आणि मिहानच्या विविध वेंडर (vendors) यांना भेटून त्यांचे प्रश्न समजून घेतले. तातडीने सोडविण्याचे आश्वासन दिले.

स्टार हॉटेल प्रकल्पासाठी 6.79 एकर जमीन घेतलेल्या गुंतवणूकदारांशीही त्यांनी चर्चा केली. सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून लवकरच बांधकाम सुरू करण्याचे त्यांनी सांगितले. आपल्या भेटीत त्यांनी नागपूरसाठी महत्त्वाकांक्षी ठरणाऱ्या 234 एकर विस्तीर्ण जागेत तयार होत असलेल्या पतंजली उद्योग (Patanjali Industries) समुहासोबतही चर्चा केली. पतंजली फुड अँड हर्बल पार्कचे (Patanjali Good & Harbal Park) महाव्यवस्थापक डी. जी. राणे यांच्याशी त्यांची चर्चा झाली.

पतंजली फूड पार्कमध्ये फ्लोअर मिल सुरू करण्याचे काम पूर्णत्वास आले असल्याची माहिती राणे यांनी दिली. सर्व मशिनरी पोहचल्या आहेत. अंतर्गत रस्ते बांधणीचे कामही जोरात सुरू आहे. फॅक्टरी हँगरमध्ये प्लास्टरिंगचे काम पूर्णत्वास आले आहे, फ्लोअरिंग आणि पेंटिंगचे काम लवकरच सुरू होईल आणि 2-3 आठवड्यांत, महिनाभरात उत्पादन सुरू होईल, असे त्यांनी सांगितले.

मिहान प्रकल्पातील इतर पायाभूत सुविधांच्या विकास कामांचा आणि इतर विविध समस्यांचा सविस्तर आढावा घेतला. श्री कपूर यांनी मिहान प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांच्या (PAP) समस्यांबाबत आमदार टेकचंद सावरकर यांच्यासोबत बैठक घेतली. त्यांनी सावरकरांना आश्वासन दिले की, मिहान प्रकल्पबाधित खापरी गावातील प्रकल्पग्रस्तांसाठी वाढीव भरपाई (compensation) आणण्यासाठी विमानतळ विकास कंपनी आवश्यक ती कार्यवाही करेल.

अधिकाऱ्यांशी चर्चा करताना त्यांनी गेल्या 2 वर्षात कोविड महामारीचा (covid pandemic) आव्हानात्मक टप्पा असूनही, मिहानने निर्यातीत भरीव वाढ केल्याबद्दल कौतुक केले. आरोग्य, विमान वाहतूक, फार्मास्युटिकल्स, ऍग्रो, आयटी आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात काही नवीन गुंतवणूकदारांना आकर्षित केले आहे. अनेकांसोबत बोलणी सुरू आहे. लवकरच यामध्ये यश येईल व वेगवेगळ्या क्षेत्रातील कंपन्यांच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here