@maharashtracity

नवी दिल्ली: ‘जैवविविधता व राज्य मानके’ या विषयावरील महाराष्ट्राच्या चित्ररथास “लोकपसंती” या वर्गवारीत प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या राजपथावरील पथसंचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ (tableaux of Maharashtra) सहभागी झाला होता.

यावर्षीपासून राजपथावरील (Rajpath) पथसंचलनात सामील झालेल्या राज्यांच्या चित्ररथाला आणि लष्करी मार्चिंग तुकडीला ऑनलाईन नोंदणीव्दारे मत देऊन जिंकविता येईल, असे संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले होते. त्याप्रमाणे प्रजासत्ताक दिनी राजपथावरील पंथसंचलन संपल्यानंतर MyGov या पोर्टलवर ऑनलाईन मत नोंदणी सुरू झाली होती. हे मतदान 31 जानेवारी 2022 च्या रात्रीपर्यंत सुरू होते.

असा होता महाराष्ट्राचा ‘जैव विविधता व राज्य मानके’ चित्ररथ

चित्ररथाच्या दर्शनी भागातील ‘ब्ल्यू मॉरमॉन’ (Blue Mormon) फुलपाखराची 8 फूट उंच आणि 6 फूट रूंद पंखांच्या देखण्या प्रतिकृतीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. चित्ररथावर राज्यफुल ‘ताम्हण’चे रंगीत गुच्छ दर्शविण्यात आले. या फुलांवरील छोटया आकर्षंक फुलपाखरांच्या लोभस प्रतिकृतीही उठून दिसत होत्या.

चित्ररथावर मोठया आकारातील ‘शेकरू’ हा राज्यप्राणी तसेच, युनेस्कोच्या (UNESCO) सूचीमध्ये समावेश असलेले ‘कास पठार’ (Kas Plateau) दर्शविण्यात आले. या पठारावर आढळणारी विविध जैव विविधता (biodiversity) दर्शविण्यात आले.

‘हरियाल’ पक्षाची प्रतिकृती, चित्ररथाच्या मागील भागात वृक्षाच्या फांदीवर बसलेल्या राज्यप्राणी शेकरूची प्रतिकृती आणि राज्यवृक्ष ‘आंबा’ ची प्रतिकृतीही उपस्थितांचे आकर्षण ठरले. माळढोक पक्षी, खेकडा तसेच, मासा, वाघ, आंबोली झरा, फ्लेमिंगो, गिधाड, घुबड पक्ष्यांच्या प्रतिकृतींनीही उपस्थितांचे मन जिंकली होती.

‘मावज’ची ऑनलाईन मोहीम

महाराष्ट्र राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयानेदेखील (DGIPR) या चित्ररथाला ऑनलाईन मतदान करण्यासंदर्भात आवाहन करण्यासाठी सर्व समाजमाध्यमांद्वारे विशेष मोहीम राबवली होती. यामध्ये महाराष्ट्राला सर्वांधिक 23 टक्के मते मिळाली होती.

ऑनलाईन मतदानात उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) व महाराष्ट्रात चुरस होती. सुरुवातीच्या टप्प्यात उत्तर प्रदेश 21 टक्के ऑनलाईन मते मिळवून आघाडीवर होता. महाराष्ट्रास या टप्प्यात 17 टक्के मते प्राप्त झाली होती. मात्र अंतीम टप्प्यात झालेल्या चुरशीच्या स्पर्धेत महाराष्ट्राने 23 टक्के मते मिळवुन प्रथम क्रमांक पटकाविला. दुसरा क्रमांक उत्तर प्रदेश- (22 टक्के) तर, तिसऱ्या क्रमांकावर जम्मु व काश्मीर (13 टक्के) राहिले.

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh), राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर व सचिव सौरभ विजय यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक बिभीषण चवरे यांच्या देखरेखीखाली या चित्ररथाची निर्मिती करण्यात आली. हा चित्ररथाची संकल्पना रेखाचित्र व त्रिमितीय प्रतिकृती तुषार प्रधान आणि रोशन इंगोले या तरूण मूर्तीकार व कलादिग्दर्शक यांनी केले होते.

यावर्षीचा हा चित्ररथ नागपूरच्या ‘शुभ ॲड्स’ ने तयार केला आहे. संचालक नरेश चरडे, पंकज इंगळे आणि राहूल धनसरे व त्यांच्या 30 मूर्तीकार व कलाकारांसह भव्य प्रतिकृतीचे काम प्रत्यक्ष दिल्लीतील रंगशाळेत पूर्ण केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here