@maharashtracity
राज्यभरात ३४६० औषध दुकानांची एफडीकडून तपासणी
मुंबई: औषध दुकानांमध्ये फार्मसिस्टची उपस्थिती पडताळण्यासाठी १३ सप्टेंबर ते २० सप्टेंबर या कालावधीत अन्न व औषध प्रशासनाने धडक मोहिम राबविली. यावेळी राज्यभरात ३४६० तपासण्या करण्यात आल्या. यात २७७ ठिकाणी फार्मसिस्ट गैरहजर असल्याचे आढळून आले. (FDA found no pharmacist in medical shops)
त्यापैकी २४६ औषध विक्रेत्यांना विक्री बंदचे आदेश देण्यात आले आहेत. तर २७७ औषध विक्रेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून अशांचे परवाने रद्द करणे यासारखी सक्त कारवाई करण्यात येत आहे.
दरम्यान, औषधांच्या दुकानांमध्ये फार्मासिस्ट यांच्या देखरेखीखालीच वर्गीकृत औषधांची विक्री केली जावी अशी कायदेशीर तरतूद आहे.
एखाद्या औषध विक्रेत्यांकडे काही कालावधीसाठी रजिस्टर फार्मसिस्ट नसल्यास त्यांनी त्या कालावधीत औषधांची विक्री करू नये, त्यांनी त्यांचे दुकान बंद ठेवावे.
यापुढे जर रजिस्टर फार्मासिस्ट यांच्या गैरहजेरीत वर्गीकृत औषधांची विक्री केल्याचे आढळून आल्यास अशा औषध विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात येतील, अशी ताकीद देण्यात आली आहे. तरीदेखील काही मेडिकल दुकानांमध्ये फार्मसिस्ट यांच्या गैरहजेरीत औषधांची विक्री केली जाते, असे काही प्रकरणी निदर्शनास आले.
त्यामुळे याबाबत पडताळणीसाठी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त परिमल सिंह यांच्या सुचने नुसार संपूर्ण राज्यात रजिस्टर फार्मासिस्टच्या उपस्थितीबाबत पडताळणीसाठी धडक मोहिम राबविण्यात आली.
२७७ ठिकाणी फार्मसिस्ट गैरहजर
एफडीएच्या कारवाईत नाशिक विभागात ४७१ दुकानांची तपासणी केली असता ३१ दुकानात फार्मासिस्ट आढळले नाहीत. तर अमरावती विभागात २६४ पैकी ३७, पुणे विभागात ७२२ पैकी ३४, बृहन्मुंबई विभागात ५८८ पैकी ५५, नागपूर विभागात ३४४ पैकी२९, औरंगाबाद विभागात २७० पैकी २०, कोंकण विभागात ८०१ पैकी ७१ दुकानात फार्मासिस्ट नव्हते.
ग्राहकांना फार्मसिस्टच्या गैरहजेरीबाबत काही तक्रार असल्यास त्यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर किंवा स्थानिक संबंधित सह आयुक्त /सहाय्यक आयुक्त यांच्या कार्यालयात किंवा hqfdadesk13@gmail.com या इमेल वर तक्रार करू शकता, असे अन्न व औषध प्रशासनाने सांगितले.