@maharashtracity

पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना गीतेचे धडे द्यावेत

भाजपच्या नगरसेविका योगीता कोळी यांची मागणी

काँग्रेसकडून टीका

महापौरांचा सकारात्मक प्रतिसाद

मुंबई: मुंबई महापालिकेची निवडणूक (BMC polls) तोंडावर आलेली असताना भाजपच्या मालाड येथील नगरसेविका योगीता कोळी (वार्ड क्रमांक ४६) यांनी पालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून भगवत गीतेचे धडे देण्याची मागणी महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांच्याकडे केली आहे. मात्र, विरोधी पक्षनेते रवी राजा (Ravi Raja) यांनी त्यावर जोरदार आक्षेप घेतला आहे.

भाजपला (BJP) निवडणुकीच्या तोंडावरच गीतेचे धडे देण्याची मागणी का करावी लागते. २०१७ च्या निवडणुकीनंतर लगेचच याबाबतची मागणी त्यावेळी का केली नाही, असा सवाल करीत रवी राजा यांनी भाजपवर तोफ डागली आहे. त्यामुळे आता या भगवत गीता पठनाचे राजकीय पडसाद उमटायला लागले आहेत. याबाबतच्या ठरावाची सूचना पालिका सभागृहात मंजुरीला आल्यास त्यास कदाचित काँग्रेस (Congress) व समाजवादी पक्षातर्फे (Samajwadi Party) विरोध केला जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे

तर दुसरीकडे हिंदुत्ववादी पक्ष म्हणून ओळख असलेल्या शिवसेनेच्या (Shiv Sena) नगरसेविका व मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी, सकारत्मक प्रतिसाद दिला आहे. भाजप नगरसेविका योगीता कोळी (BJP Corporator Yogita Koli) यांनी, महापौर किशोरी पेडणेकर यांना भाजपतर्फे भगवत गीता ग्रंथाची एक प्रत भेट दिली. महापौरांनी पायातील चपला बाजूला काढून गीतेचा व निवेदनाचा आदर राखत व सकारात्मकता दर्शवत स्वीकार केला. यावेळी, मुंबईचे उपमहापौर ऍड. सुहास वाडकर हे उपस्थित होते.

योगीता कोळी यांची गीतेबाबत नेमकी मागणी

भगवद्‌गीता (Bhagwat Geeta) हा प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान विषयक ग्रंथ आहे. तसेच हा ग्रंथ वेदांच्या अखेरच्या रचनेतील ‘गीतोपनिषद’ म्हणूनही प्रसिद्ध आहे. त्यात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जीवनाबद्दल केलेला उपदेश आहे.

५००० वर्षांपूर्वी २५ डिसेंबर ह्या दिवशी श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली. भारतीय या ग्रंथाला पवित्र धर्मग्रंथ समजतात. त्यामुळे न्यायालयात गीतेवर हात ठेवून शपथ घेण्याची प्रथा पडली आहे. महाभारतातल्या (Mahabharat) महायुद्धाच्या वेळेस भगवान श्रीकृष्णांनी गीता अर्जुनास मार्गदर्शन स्वरूपात सांगितली, असे महाभारताच्या कथेत म्हटले आहे.

हा ग्रंथ मानवाला परमोच्च ज्ञान देतो आणि जीवन कसे जगावे यांचे मार्गदर्शन करतो असे मानले जाते. सामान्य जनांमध्ये भगवत्-गीता, ‘गीता’ या नावाने ओळखली जाते.

गीतेतील ज्ञानामुळे माणसाला अत्युच्च समाधान आणि आनंद मिळतो व त्याचप्रमाणे मोक्षाचा मार्ग सापडण्यास मदत होते. त्यामुळे महापालिकेच्या शाळांमधून भगवत गीता पठन केले जावे. जेणेकरून भावी पिढीवर योग्यप्रकारचे संस्कार होतील, असे नगरसेविका योगीता कोळी यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here