@vivekbhavsar
मुंबई: राज्याच्या उद्योग विभागासाठी (Industries Department) आणि एकूणच महाराष्ट्राच्या (Maharashtra) औद्योगिक विकासासाठी दिल्ली – मुंबई औद्योगिक कॉरिडॉर (डी एम आय सी)चे (Delhi – Mumbai Industrial Corridor) मोठे योगदान आहे. या डी एम आय सी चे (DMIC) उगम राज्यातील ज्या औरंगाबाद शहरातील शेंद्रा – बिडकीन औद्योगिक क्षेत्रातून (Shendra-Bidkin) होते, त्याच शहरातील उद्योग विभागातील एका अधिकाऱ्याने प्रत्येक व्यवहारात स्वतःचा ‘कट’कर लावून प्रचंड माया जमा केली आहे.
मोगल काळातील जिझिया कराप्रमाणे हा अधिकारी ‘कट’ कर लावून वसुली करत असल्याने स्थानिक लघु उद्योजक आणि जमिनीचे मालक असेलेले शेतकरी (farmers) त्रस्त झाले आहेत.
यासंदर्भात महाराष्ट्र सिटीकडे उपलब्द्ध झालेल्या कागदपत्रांतून असे दिसतेय की या अधिकाऱ्याने अवैध मार्गाने कमावलेली माया त्याची पत्नी आणि नातेवाईक यांच्या नावाने नाशिक (Nashik) आणि परिसरात बांधकाम व्यवसाय, जमिनी आणि हॉटेल उद्योगात गुंतवली आहे.
महाभारतातील ‘संजय’ प्रमाणे याला दूरदृष्टी असल्याची उपरोधिक टीका एम आय डी सी (MIDC) मधील एका माहितगाराने दिली.
“नवीन उद्योग कुठल्या परिसरात येणार आहे, उद्योग विभागाला कोणत्या गावाची जमीन अधिग्रहित करायची आहे, हे या अधिकाऱ्याला महाभारतातील ‘त्या’ पात्राप्रमाणे दिसते. मग हा अधिकारी त्या गावातील जमीन मालकांशी मध्यस्थामार्फत संधान साधून आगाऊ रक्कम देतो आणि एम आय डी सी कडून चांगला मोबदला मिळेल असे आश्वासन देऊन मधल्या मध्ये मलाई कमावतो,” अशी माहिती या सूत्राने दिली.
तर शिवसेनेचा (Shiv Sena) अन्य एक नेता या अधिकाऱ्याच्या कारभाराला इतका कंटाळला आहे की ‘ही घाण आमच्याकडे नको’ अशा शब्दात याचे वर्णन केले.
या अधिकाऱ्याची उचलबांगडी करा, अशी विनंती शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी उद्योग विभागाच्या मंत्र्यांकडे केली आहे.
या अधिकाऱ्याने नाशिकमध्ये कुठे कुठे गुंतवणूक केली आहे, याचे कारनामे काय काय आहेत, पत्नीचे उत्पन्नाचे साधन काय आणि तिच्या नावावर एवढी संपत्ती कशी? याबाबतचा धमाका महाराष्ट्र सिटी लवकरच करणार आहे.