@maharashtracity
विठ्ठल कामत, डॉ योगेश जाधव, राहुल देशपांडे, निरंजन हिरानंदानी, अनंत जोग सन्मानित
मुंबई: कोरोना संसर्गाने केवळ भारतालाच नाही तर सर्व जगाला ग्रासले. विविध देशांमध्ये आर्थिक वर्चस्वासाठी शस्त्रास्त्रांची स्पर्धा सुरु असताना कोरोनाने सर्व जगाला एक होऊन संसर्गाशी एकत्रितपणे लढण्यास बाध्य केले. कोरोनाचे संकट अद्याप संपलेले नाही. अशावेळी सर्वांनी खांद्याला खांदा लावून सहकार्य केले तसेच निरंतर जागरुकता व जबाबदार वर्तन ठेवले तर कोरोनासारखी कितीही संकटे आली तरीही त्यांचा धैर्याने सामना करता येईल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी केले.

राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते गुरुवारी (दि. २३) राजभवन येथे ‘ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम’तर्फे (Global India Business Forum) देण्यात येणारे राष्ट्रीय पुरस्कार यशस्वी उद्योजक, विविध क्षेत्रातील कलाकार तसेच करोना योद्ध्यांना प्रदान करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

पुरस्कार सोहळ्यात प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक विठ्ठल कामत, पुढारी उद्योग समूहाचे अध्यक्ष डॉ योगेश जाधव, शास्त्रीय गायक राहुल देशपांडे, अभिनेते अनंत जोग, बांधकाम व्यावसायिक निरंजन हिरानंदानी यांसह विविध क्षेत्रातील ३४ मान्यवरांना व कोरोना योद्ध्यांना सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाला इजिप्तचे मुंबईतील वाणिज्यदूत एतिया अबू एल्नागा, बांगलादेशचे मुंबईतील उप-उच्चायुक्त मोहम्मद लूतफोर रहमान, ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमचे अध्यक्ष डॉ जितेंद्र जोशी, डॉ योगेश दुबे प्रामुख्याने उपस्थित होते.
