@maharashtracity

भाजपचे ठिय्या आंदोलन

मुंबई: स्थायी समितीच्या बुधवारच्या बैठकीत शहर व पश्चिम उपनगरातील ४१३ कोटी रुपयांच्या सिमेंट काँक्रीट रस्ते (Cement Concrete roads) कामांचे ९ प्रस्ताव साधक- बाधक चर्चेनंतर मंजूर करण्यात आले.

मात्र, यावेळी भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे (Prabhakar Shinde) व पक्षाच्या नगरसेवकांनी रस्ते कामांच्या गुणवत्ता व दर्जाबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यात व शंकासमाधान करण्यात वेळकाढूपणा केल्याचा आरोप करीत पालिका सभागृहात काही काळ ठिय्या आंदोलन करीत प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.

यावेळी, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांनी, प्रभाकर शिंदे यांची समजूत काढण्याचा बराच काळ प्रयत्न केला. पुढील बैठकीत प्रशासनाने तुम्हाला लिखित उत्तरे न दिल्यास बैठक सुरू करणार नाही, असे आश्वासन समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिल्यानंतर भाजपने (BJP) ठिय्या आंदोलन मागे घेतले.

मुंबईत निवडणुकीच्या तोंडावर २० डिसेंबर रोजीच्या बैठकीत १ हजार ७२० कोटी रुपयांच्या सिमेंट काँक्रीट रस्ते कामांचे ३९ प्रस्ताव भाजपच्या विरोधाला न जुमानता सत्ताधारी शिवसेनेने (Shiv Sena) विरोधी पक्षाच्या सहकार्याने मंजूर केले होते.

त्यानंतर आता पुन्हा एकदा पश्चिम उपनगरातील ७ वार्डात २८७ कोटी रुपयांची तर शहर भागात ३ वार्डात १२६ कोटी रुपयांची अशी एकूण ४१३ कोटी रुपयांची सिमेंट काँक्रिट रस्त्यांची कामे करण्याबाबत सादर ९ प्रस्ताव बुधवारी पार पडलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आले.

त्यामुळे अवघ्या १० दिवसांत रस्ते कामांचे तब्बल २ हजार १३३ कोटींचे ४८ प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत.

यावेळी, रस्ते कामांबाबतचा विषय क्रमांक ५० मंजुरीसाठी आला असता भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी सांगितले की भाजपचा रस्ते कामाला विरोध नाही. ते म्हणाले की गेल्या १७ मार्च २०२० पासून रस्ते कामांचे कोट्यवधी रुपयांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. या रस्त्यांची कामे कमी दरात केल्याने रस्त्यांच्या गुणवत्ता, दर्जाबाबत अनेकदा प्रश्न उपस्थित केला.

आतापर्यंत बनवलेल्या रस्ते कामांचा अहवाल मागूनही प्रशासनाकडून अपेक्षित माहिती दिली जात नाही, अशी तक्रार करीत प्रभाकर शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

भाजपचे सदस्य भालचंद्र शिरसाट (Bhalchandra Shirsat) यांनी, रस्ते कामांच्या प्रस्तावात रस्त्यांची लांबी, रुंदी याबाबत कोणतीही माहिती दिली नसल्याची तक्रार केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here