अगोदरचे ९५, नवीन २७० असे एकूण ३६५ प्रस्ताव मंजुरीला सादर
३६५ पैकी ८०% प्रस्ताव मंजूर
भाजपकडून प्रचंड गदारोळ, विरोधी पक्ष चिडीचूप
सत्ताधाऱ्यांचाही भाजपवर हल्लाबोल
@maharashtracity
मुंबई: १४ व्या मुंबई महापालिकेची (BMC) मुदत आज संपुष्टात येत असताना स्थायी समितीच्या शेवटच्या बैठकीत अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांनी, प्रारंभीच हरकतीच्या मुद्द्यांवर बोलू न दिल्याचा आरोप करीत भाजप नगरसेवकांनी (BJP Corporators) जोरदार गदारोळ घातला. त्यावर सत्ताधारी शिवसेनेच्या (Shiv Sena) नगरसेवकांनीही प्रतिघोषणाबाजी करीत त्यास चोख उत्तर दिल्याने पालिका सभागृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मात्र, याच गोंधळात समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी, भाजपच्या गदारोळाकडे दुर्लक्ष करीत शेवटच्या दिवशी स्थायी समितीमध्ये सादर अंदाजे ६ हजार कोटींच्या ३६५ प्रस्तावांपैकी ८०% प्रस्ताव केवळ ३० मिनिटात मंजूर केले.
या ३६५ प्रस्तावांमध्ये, नाहूर रुग्णालयाच्या (Nahur Hospital) विकास कामाचा ७६९ कोटी रुपयांचा प्रस्ताव, कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाचे विकास काम (शताब्दी) ५०९ कोटी रुपये, मलबार टेकडी जलाशयाचे विकास काम ६९८ कोटी रुपये, नायर रुग्णालयाचे काम ३४८ कोटी रुपये, पवई – घाटकोपर जलाशय बोगदा ६०७ कोटी रुपये, अग्निशमन दल १२६ कोटी रुपये,
मलनि:स्सारण वाहिन्यांचे काम ८० कोटी रुपये, दक्षिण मुंबईतील लहान रस्ते कामे २३ कोटी रुपये, नाल्यांचे बांधकाम २२ कोटी रुपये,
मानखुर्द लहान रस्ते २६ कोटी रुपये, कुर्ला लहान रस्ते २५ कोटी रुपये, अगोदरचे अंदाजे ६०० कोटींचे प्रलंबित प्रस्ताव आणि इतर कामांचे ३०० कोटींचे प्रस्ताव आदींचा समावेश होता. मात्र अवघ्या ३० मिनिटात कोट्यवधी रुपयांचे किमान ८० टक्के प्रस्ताव मंजूर झाल्याने पालिका वर्तुळात चर्चेला उधाण आले होते.
स्थायी समितीची बैठक संपल्यावर भाजपच्या नगरसेवकांनी गटनेते प्रभाकर शिंदे (Prabhakar Shinde) यांच्या नेतृत्वाखाली पालिका सभागृहात स्थायी समितीची बैठक सुरू झाल्यापासून ते बैठक संपेपर्यंत शिवसेना, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तर शिवसेनेच्या नगरसेवकांनीही सभागृहनेत्या विशाखा राऊत (Vishakha Raut) यांच्या अध्यक्षतेखाली प्रतिघोषण देत भाजपला जशास तसे उत्तर देण्याचा प्रयत्न केला.
मात्र, स्थायी समितीची बैठक संपल्यानंतर भाजपच्या नगरसेवकांनी पुन्हा एकदा पालिका आयुक्त इकबाल चहल (BMC Commissioner IS Chahal) यांच्या दालनासमोरच सत्ताधारी शिवसेना व स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या विरोधात फलकबाजी व घोषणाबाजी करीत तीव्र निषेध व्यक्त केला.