@maharashtracity
धुळे
कर्नाटकातील शिमोंगा येथील बजरंग दलाच्या हर्षा नावाच्या 26 वर्षीय तरुण कार्यकर्त्याचा जिहादी विचारधारेच्या व्यक्तींकडून चाकूने भोसकून खून करण्यात आला. ही घटना अत्यंत निंदनीय असून, या घटनेतील दोषींना फाशीची शिक्षा द्यावी, देशभरातील जिहादी संघटनांवर त्वरित बंदी घालावी, या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलातर्फे बुधवारी शहरातील कराचीवाला खुंटाजवळील श्रीराम मंदिरापासून मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चात विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष योगीराज मराठे, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री अॅड.विशाल पिंपळे, बजरंग दलाचे जिल्हा संयोजक अनिल मोरे, सहसंयोजक हेमंत कच्छवे, जिल्हा उपाध्यक्ष राजू निफाडकर, गोवर्धन पटेल, प्रांत विशेष संपर्कप्रमुख भरत देवळे, कोशाध्यक्ष मुकेश खंडेलवाल, योगेश बाविस्कर, निलेश दीक्षित, विशाल विसपुते, मठाधिपती भाऊ महाराज रुद्र, मच्छिंद्र महाराज, महानगर मंत्री ज्ञानेश्वर माळी, महानगराध्यक्ष निलेश रुणवाल, उपाध्यक्ष विनोद सोमाणी, अजय अग्रवाल यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
याबाबत विश्व हिंदू परिषदेचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी कार्यालयात केले व जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे, की हर्षाच्या खून प्रकरणात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया, कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया, सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया आदी संघटनांनी विष पेरण्याचे काम केले. परिणामी हर्षाची हत्या झाली. सिमीचेच दुसरे रूप असलेल्या या संघटनांची पाळेमुळे महाराष्ट्रातही खोलवर रुजली असून, या संघटनांवर व त्यांच्या नेत्यांवर तातडीने बंदी घालत त्यांचा पायबंद करावा. अन्यथा हिंदू समाज व हिंदुत्वत्वादी संघटना त्यांना वठणीवर आणण्यासाठी सक्षम आहे. कायदा कायद्याचे काम करेलच. परंतु अशा संघटनांना पाठीशी घालणार्या राजकीय नेतृत्वानेही याचा विचार करून सुधारणा करावी, या घटनेतील दोषींना फाशीची शिक्षा द्यावी.या संघटनांचा योग्य बंदोबस्त करावा, अन्यथा विश्व हिंदू परिषद, बजरंग दल कायदेशीर व संविधानिक मार्गाने याला उत्तर देईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला.